लोहारा : तालुक्यातील भातागळी येथे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण असून, खरीप हंगाम वाया गेला, रबीची आशा नाही. त्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्यामुळे सोन्यासारखी जनावरे शेतकरी कवडीमोल किंमतीत विकत असून, अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. तेरणा नदीकाठी वसलेले तीन हजार लोकसंख्येचे भातागळी हे गाव. गावचा मुख्य व्यवसाय शेती. यंदा लोहारा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. परंतु खरिपातील पिकांनीही दगा दिला. पेरणीसाठी झालेला खर्चही निघाला नाही. आता रबीच्या तोंडावरही पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पावसाच्या भरवशावर रबीची पेरणी करणेही या भागातील शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेले पशुधन विक्रीसाठी काढले. गावातील सुमारे तीस ते पस्तीस बैलजोड्या अक्षरश: कवडीमोल दराने विकल्या गेल्याने शेतकऱ्यांसमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही करतात. याच अनुषंगाने येथे पाच दूध संकलन केंद्रही होते. गावातून दररोज पाचशे ते सहाशे लिटर दूध संकलित होत होते. परंतु, पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे अनेकांनी दुभती जनावरेही विकली असून, त्यामुळे या भागातील दूध संकलनही कमी झाले आहे. गावातील दूध संकलनाचा आकडा पाचशे वरून पन्नास ते साठ लिटरवर आला आहे. मजुरीसाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतरित होत असल्याने गावही ओस पडत आहे. गावात रोजगार निर्मिती करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)शेतात कामे नाहीत, अशा परिस्थितीत मजुरांच्या कामाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. कामाच्या शोधार्थ भातागळीतील अनेक मजूर औसा, निलंगा, उमरगा तालुक्याकडे स्थलांतरित होत असल्याचेही दिसून येत आहे. भातागळीत सरकारी व खाजगी दूध संकलन केंद्राची संख्या पाचवर आहे. शेतीला जोडधंदा म्हणून गायी, म्हशी पालनाचा व्यवसाय येथे केला जातो. परंतु, दुष्काळी परिस्थितीत जनावरे विकावी लागल्याने दूध संकलन केंद्रही गुंडाळण्यात आले आहे.वर्षाकाठी ७० हजाराच्या घरात पगार देऊन शेतकरी सालगडी ठेवतात. परंतु यंदा शेतकऱ्यांच्या हाती यंदा काहीच लागले नसल्याने शेतकऱ्यांनी सालगडी ठेवले नसून, हे सालगडी रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित होत आहेत.
दुष्काळाच्या धास्तीने तीस बैलजोड्या विकल्या !
By admin | Updated: November 24, 2014 00:35 IST