महेबूब बक्षी , भादागेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ शेकडो हेक्टर्स जमिनीवरील पिके उद्धवस्त झाली़ ते संकट अद्याप सरले नाही, तोवरच खरीप हंगामातील बियाणांच्या किंमतीत १००० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे़ सध्या खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे बियाणांच्या तजवीजीसाठी शेतकरी धावपळ करीत आहे़ भादा परिसरात सत्तर टक्के क्षेत्र खरीपाचे आहे़ फक्त पावसाळी पिके घेऊन वर्षभर कुटुंबाचा गाडा चालविणारे शेतकरी या भागात मोठ्या प्रमाणात आहेत़ परंतु, बि-बियाणांच्या भावामध्ये कमालीची वाढ झाल्याने पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे़ गतवर्षी सोयाबीन बियाणांचा दर १६५० ते १७०० रूपये बॅग प्रमाणे होता़ पण यंदा मात्र या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १ हजार रूपये शेतकऱ्यांना जास्तीचे मोजावे लागत आहे़ महाबीजच्या ३० किलोच्या बॅगसाठी २३८५ रूपये, ईगल-२७००, ग्रीन गोल्ड-२५००, कृषीधन-२५०० असा दर आहे़ सम्राट डीएपी-११८३ ते ११९० दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी अधिकारी एस़एस़शिंदे यांनी दिली़ परंतु, या किमतीमध्ये बाजारामध्ये खते-बियाणे मिळत नाहीत़ सोयाबीनचाही तुटवडा आहे़ कृषी विभागाच्या वतीने घरगुती बियाणे वापरा, अशा सूचना देऊन महाबीज कंपनीची जाहिरात करत असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे़परिणामी गारपीटग्रस्त शेतकऱ्याला खरीप हंगामाची पेरणी करणे अवघड जात आहे़ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे़ त्यातच बियाणांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात विक्रीसाठी येणारे सोयाबीन बियाणे ५० टक्क्याने घटल्याने बियाणांचे दर वाढले आहेत़ शेतकऱ्याला गतवर्षी सोयाबीनला ३५०० ते ४००० रूपये भाव मिळाल्याने सीड प्लॉटधारकांनी वाढ केल्याची माहिती मिळाली आहे़ कृषी अधिकारी शिंदे म्हणाले, बियाणे उपलब्ध होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे़ शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे पेरावीत़मागणी वाढली़़़यंदा बाजारात खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीनसाठी ९० टक्के मागणी असल्याने व्यापाऱ्यांनी वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच महामंडळाकडे १०० टक्के सोयाबीनचे पैैसे भरले आहेत़ परंतु, महामंडळाकडून २५ टक्के माल दिला जात आहे़ अद्यापही ७० टक्के बियाणे महामंडळाकडे शिल्लक असतानाही शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे़
सोयाबीन बियाणांच्या किंमतीत दीडपट वाढ
By admin | Updated: June 9, 2014 00:08 IST