औरंगाबाद : पर्यटकांना मोहिनी घालणाऱ्या जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पर्यटकांना पाहता याव्यात या दृष्टीने एका खाजगी विमानसेवा कंपनीच्या मदतीने मुंबई ते अजिंठा हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येणार आहे. १५ डिसेंबरला या सेवेची चाचणी घेण्यात येणार होती. काही तांत्रिक कारणांमुळे ही चाचणी आता डिसेंबरअखेर घेण्यात येणार आहे.अजिंठा लेण्या पाहण्यासाठी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विमानाने येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबादहून वाहनाद्वारे ये-जा करावी लागते. वेळ आणि पैसा जास्त खर्च होत असल्याने एमटीडीसीने मुंबई ते अजिंठा हवाई सेवा करण्याच्या हालचाली सुरू केल्या. या सेवेसाठी ‘गिरीसन एअरवेज’ कंपनीसोबत चर्चा करण्यात आली. कंपनीनेही होकार दर्शवला. २८ नोव्हेंबर रोजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक जैन यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली. प्रशासनानेही त्यांना हवाई सेवा सुरू करण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला. विविध शासकीय कार्यालयांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.दरम्यान, १५ डिसेंबर रोजी हवाई सेवेची चाचणी घेण्यात येणार होती. किमान दीड तासाच्या या सेवेत पर्यटकांना परवडेल असे भाडे ठेवण्यात येणार आहे. ‘लोकमत’शी बोलताना जैन म्हणाले की, हवाई चाचणी काही तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. डिसेंबरअखेर चाचणी घेण्याचे निश्चित झाले असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के हवाई सेवा सुरू होईल. विविध शासकीय कार्यालयांकडून कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
डिसेंबरअखेर चाचणी, नवीन वर्षात सेवा
By admin | Updated: December 13, 2014 00:29 IST