पाथरी : दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाकडून विशेष शिकवणी वर्गाचे पाथरी येथे आयोजन करण्यात आले आहे़ मानव विकास कार्यक्रमांतर्गत दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेले विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रक्रियेत यावेत, यासाठी मागील काही वर्षांपासून विशेष शिकवणी वर्गात प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे़ पाथरी येथील शांताबाई नखाते विद्यालयामध्ये दरवर्षी दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर आशा विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने विशेष शिकवणी वर्गामध्ये तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रवेश देण्यात येतो़ प्रत्येक शिकवणी वर्गात १० ते २० विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येतो़ हे शिकवणी वर्ग इंग्रजी, गणित, विज्ञान व वाणिज्य या विषयासाठी असणार आहेत़ पाथरी तालुक्यात नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालामध्ये ७९ विद्यार्थी नापास झाले आहेत़ यामुळे या विद्यार्थ्यांना वेळेच्या आत पुरवणी परिक्षा देण्यासाठी या शिकवणी वर्गाचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक विषयासाठी एम़ए़बीएड, बी़एस्सी़ बीएड, गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयांच्या तज्ञ शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे़ तीन महिने शिकवणी वर्गासाठी एकत्रित मानदान प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात येणार असून, या शिकवणी वर्गातील उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी २ हजार रुपये सानुग्रह अनुदान राष्ट्रीयकृत बँकेत एफडीआरच्या स्वरुपात ठेव म्हणून देण्यात येणार आहे़ (वार्ताहर)उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यामागे विषय शिकविणार्या शिक्षकांना एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे़ दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी डी़ आऱ रणमाळे यांनी केले आहे़
विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग
By admin | Updated: June 5, 2014 00:10 IST