औरंगाबाद : औरंगाबादसह देशभरातील निवडणूक निकालासंबंधीचे चित्र दुपारी स्पष्ट होताच शहरात निकालावर जोरदार खल सुरू झाला. ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी स्थिती शहरभर होती. अनेक नागरिक ‘चहा’च्या चुस्कीसोबत मोदींची त्सुनामी, दिग्गज उमेदवारांच्या पदरी आलेला पराभव यावर चर्चा करताना दिसून आले. शहरात सकाळी ८ वाजेपासूनच औरंगाबादकर टीव्हीसमोर खिळून बसले होते. अनेक शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांनी कामाला दांडी मारली होती. देशातील सर्वांत मोठा ‘टॅलेंट शो’ पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. १० वाजेपासूनच नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशभरातील अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतल्याचे दिसून आले. मतदारांचा कौल मोदींच्या झोळीत पूर्णत: असल्याचे पाहून अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली. सेना-भाजपा आणि महायुतीमधील मित्रपक्षांनी शहराच्या चौकाचौकांत ढोल-ताशे वाजवत आनंदोत्सव साजरा सुरू केला. दुपारी २ वाजता औरंगाबादेत विद्यमान खा. चंद्रकांत खैरे हे चौथ्यांदा बाजी मारणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. कारण त्यांनी ७० हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळविली होती. ही आघाडी आता कोणीही तोडू शकणार नाही, असा विश्वास अनेकांना होता. सायंकाळी ५ वाजेनंतर शहराच्या विविध भागांत, चौकाचौकांत चहाच्या टपरीवर गर्दी दिसून येऊ लागली. जिकडेतिकडे एकच चर्चा होती. मोदींनी काय भयानक जादू केली... कोणी मोदींच्या लाटेला त्सुनामी म्हटले, कोणी बेस्ट मार्केटिंग, तर कोणी बेस्ट प्लानिंगची उपमा दिली. यंदाच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी उमेदवारांकडे अजिबात पाहिले नाही, फक्त मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकतर्फी मतदान केल्याचे अनेकांनी नमूद केले. स्पष्ट बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ ४निराला बाजार, औरंगपुरा, गुलमंडी, पैठणगेट, सिटीचौक, शहागंज, बुढीलेन आदी भागांत चहाच्या टपरीवर गप्पांचे फड रंगले होते. ज्येष्ठ नागरिकांच्या मते इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज सत्ताधार्यांची झाली आहे. मागील ३० वर्षांमध्ये एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. एकंदरीत ‘आम’आदमीला नवीन सरकारकडून बर्याच अपेक्षा आहेत. निवडणूक प्रचारात ‘अच्छे दिन आने वाले है...’चा नारा देण्यात आला होता. तो कितपत खरा ठरतो हेसुद्धा मतदार चहाच्या चुस्कीसोबत पाहतील.
‘चहा’च्या चुस्कीसोबत रंगले चर्चेचे फड!
By admin | Updated: May 17, 2014 01:12 IST