व्यंकटेश वैष्णव , बीडभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्याप पाणी पातळी वाढली नाही, असा अहवाल दिलेला आहे. असे असताना देखील तहसील कार्यालयांनी पाण्याचे टँकर बंद केले आहेत. पाऊस पडला हाच निकष लावून भूजलच्या अहवालाकडे डोळेझाक केली आहे. सध्या ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, जी गावे टंचाईग्रस्त आहेत त्याच गावातील टँकर बंद केल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.पाऊस पडला की, दुसऱ्याच दिवशी विहीर व बोअरला पाणी आले, असे गृहित धरून तज्ञांच्या अहवालाकडे डोळे झाक करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून धारूर, आष्टी व केज तालुका वगळता इतर तालुक्यातील टँकर बंद केले आहेत. बीड भूजल विभागाच्या म्हणण्यानुसार बीड तालुक्यातील ९ व जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्यापही बोअर व विहिरींना पाणी आलेले नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधीत तहसिल कार्यालयाकडे अहवाल सादर केलेला आहे. असे असताना देखील तहसिलदारांकडून कुठलीच दखल घेतली जात नाही.भूजल विभागाकडून बीड जिल्ह्यातील पाणीपातळी बाबत पहाणी करून अहवाल सादर केला आहे. जिल्ह्यातील एकूण बारा गावांमध्ये अद्याप पाणीपातळी वाढलेली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले. बीड तालुक्यातील जेबापिंप्री, चौसाळा, देवी बाभळगाव, चांदेगाव, पालसिंगण, हिंगणी बु. आदी गावांचा समावेश आहे.पाणीपातळी वाढली नसल्याचा अहवाल असताना देखील जिल्हा प्रशासनाने पाण्याचे टँकर बंद केले. याविरोधात बीड तालुक्यातील चौसाळा येथे धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा सात ते आठ गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.मागील पाच- दहा वर्षातील सर्वाधिक तीव्र दुष्काळ यावेळी अनुभवायला मिळाला. साडेनऊशेवर टँकरची आकडेवारी गेली होती. याचा फायदा काही ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी घेत बोगस टँकर फेऱ्या दाखवल्याचे शनिवारी समोर आले आहे.४बीड तालुक्यातील जप्तीपारगाव येथे मागील तीन-चार महिन्यांपासून टँकर सुरू असल्याचे अहवालात समोर आले आहे. याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.सद्यस्थितीत चांगला पाऊस होत आहे, हे आकडेवारीवरून समोर येत आहे. मात्र ,बीड तालुक्यातील काही जमीनीवरील खडक कडक स्वरूपाचा आहे. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी वेळ लागत आहे.४भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पाणी पातळी वाढते हे भूजल विभागाचे म्हणणे आहे. मात्र ,प्रशासन याकडे दुर्लक्ष करत थेट टँकर बंद करण्याचाच निर्णय घेत असल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे.४जिल्हा प्रशासनाने भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणी अहवालाकडेच दुर्लक्ष केल्यामुळे अनेक टंचाई असलेली गावे भर पावसाळ्यात तहानलेली आहेत. १४४ प्रकल्पांपैकी केवळ दोन लघु प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी आलेले आहे. उर्वरित प्रकल्प कोरडेठाक आहेत.
टंचाईग्रस्त गावातीलच टँकर बंद
By admin | Updated: July 31, 2016 01:15 IST