उस्मानाबाद : सातबाऱ्यावर पीक कर्जाचा बोजा घेवून अभिलेखात नोंद करण्यासाठी २०० रूपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास ‘एसीबी’च्या पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई मंगळवारी दुपारी तुळजापूर शहरात करण्यात आली़नांदुरी येथील शेतकऱ्याने शेतजमिनीवर स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या तुळजापूर शाखेकडून ५० हजार रूपयांचे पीक कर्ज घेतले होते़ या कर्जासाठी शेतजमिन तारण ठेवून बोजा चढविण्यात येणार होता़ त्यामुळे सातबाऱ्यावर बोजा टाकून त्याची अभिलेखात नोंद करण्यासाठी नांदूरी सज्जाचे तलाठी शिवाजी गलांडे यांनी पाचशे रूपये लाचेची मागणी केली़ तक्रारदाराने त्यावेळी दोनशे रूपये दिल्यानंतर तीनशे रूपये आणून द्या तुमचे काम करतो, अशी मागणी केली़ त्यानंतर शेतकऱ्याने उस्मानाबाद येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीनंतर लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी दुपारी तुळजापूर शहरातील अंबिका हॉटेलमध्ये सापळा रचला़ त्यावेळी तलाठी गलांडे यांनी तक्रारदाराचे काम करण्यासाठी लाचेची मागणी करून दोनशे रूपये स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ तपास पोनि आसिफ शेख हे करीत आहेत़ (प्रतिनिधी) नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यातच ६ जानेवारी रोजी एसीबीने जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रियंका गणाचार्य यांना २५ हजाराची लाच घेताना रंगेहात जेरबंद करण्यात आले होते़ तर लाचखोरीत प्रतीवर्षी आघाडीवर राहणाऱ्या महसूल विभागाचे तलाठी शिवाजी गलांडे यांना आठ दिवसाच्या आत मंगळवारी एसीबीने २०० रूपयांची लाच घेताना जेरबंद केले आहे़
लाच घेताना तलाठी जेरबंद
By admin | Updated: January 14, 2015 00:57 IST