औरंगाबाद : स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या तलाठी सज्जांना अद्यापही हक्काची जागा मिळालेली नाही. मराठवाड्यात आजही २२०० पैकी तब्बल २१०० तलाठी सज्जांचे काम भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे. आतापर्यंत अवघ्या शंभर तलाठी सज्जांनाच स्वत:ची इमारत मिळालेली आहे.महसूल यंत्रणेतील तलाठी हा सर्वात शेवटचा घटक आहे. गावपातळीवरील दप्तर सांभाळण्याबरोबरच इतरही अनेक महत्त्वाची कामे तलाठी सज्जातून होत असतात. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे पद अस्तित्वात आहे. तरीही तलाठी सज्जांना अद्याप स्वत:ची जागा मिळालेली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ३९१ तलाठी सज्जे आहेत. तर संपूर्ण मराठवाड्यात ही संख्या २२०० इतकी आहे; पण तरीही यापैकी अवघ्या शंभर ते सव्वाशे तलाठी सज्जांनाच स्वत:च्या इमारती आहेत. उर्वरित सर्व तलाठी सज्जे भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत. शासनातर्फे दरमहा या सज्जांना शहरात दोन हजार रुपये आणि ग्रामीण भागात एक हजार रुपये इतके भाडे दिले जाते. तलाठी सज्जांप्रमाणेच ग्रामपंचायत हाही गावपातळीवरील दुसरा महत्त्वाचा घटक आहे. राज्यात स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या; पण आजघडीला सर्व ग्रामपंचायतींना स्वत:च्या जागा आणि इमारती मिळालेल्या आहेत. दुसरीकडे तलाठी सज्जांना मात्र जागा मिळालेली नाही. शेतकऱ्याकडून जागा दानकुंभेफळ येथील तलाठी सज्जासाठी नुकतीच जागा दान मिळाली आहे. येथील शेतकरी रामभाऊ शेळके यांनी २५०० स्क्वेअर फूट जागेचे दानपत्र करून दिले आहे. आता याठिकाणी तलाठी सज्जा आणि मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत बांधली जाणार आहे. राज्यात ग्रामपंचायतींच्या आधीपासून तलाठी सज्जे कार्यरत आहेत; पण तरीही या सज्जांना जागा मिळालेली नाही. तलाठी सज्जांना जागा आणि इमारत बांधून देण्यात यावी, अशी आमची जुनी मागणी आहे; पण अजून शासनाने लक्ष दिलेले नाही.- सतीश तुपे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना
तलाठी सज्जे भाड्याच्या जागेत
By admin | Updated: August 31, 2014 00:42 IST