जालना : नियमांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील तीन करोसीन व एक रेशन विक्रेत्याचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी तडकाफडकी निलंबित केला आहे. बुधवारी या चारही दुकानांना माचेवाड यांनी अचानक भेट दिल्यानंंतर हा गैरप्रकार समोर आला होता.माचेवाड यांनी अंबड व घनसावंगी तालुक्यात काही दुकानांची अचानक तपासणी केली. यात केरोसीनच्या तीन ठिकाणी केरोसीन विक्रीच्या ठिकाणी परवान्याची प्रत नसणे, साठा रजिस्टर व विक्री रजिस्टर एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून लिहिलेले नसणे, केरोसीन कार्डधारकांची यादी, अभिलेखे न ठेवणे, शिल्लक, विक्री व वाटप प्रमाणाचा तपशील दर्शविणारा फलक लावलेला आढळला नाही. त्यामुळे गोंदी ता. अंबड येथील अर्धघाऊक विक्रेते शेख वजीर शेख माणिक, किरकोळ विक्रेते अंबादास जगन्नाथ सोनटक्के, आसेफ सौदागर यांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर कोठी ता. घनसावंगी येथील चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी यांच्या रेशन दुकानामध्ये भाव फलक, साठा दर्शविणारा फलक, अंत्योदय व बीपीएल याद्या, धान्याचे नमुने, तक्रार नोंदवही इत्यादींचा अभाव आढळून आला. तसेच कार्डधारकांना चढ्या दराने धान्याची विक्री करण्याचा प्रकारही उघडकीस आला. त्यामुळे या रेशन दुकानाचा परवाना देखील निलंबित करण्यात आला. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी माचेवाड म्हणाले, आपण जिल्ह्यात कोणत्याही रेशन किंवा केरोसीन दुकानांची अचानक तपासणी करून गैरप्रकार आढळल्यास तात्काळ निलंबन कारवाई करणार आहोत. कार्डधारकांची अडचण होऊ नये, त्यांना केरोसीन व धान्य रास्त दरात व वेळेत मिळावे हीच प्रशासनाची अपेक्षा असल्याचे माचेवाड यांनी सांगितले.
चार विक्रेत्यांचे परवाने निलंबित
By admin | Updated: February 13, 2015 00:46 IST