औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षांचा निकाल दहा दिवसांत जाहीर करण्याची केलेली घोषणा फसवी निघाली. तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याची मागणी करीत सोमवारी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रकांना घेराव घातला.
यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा नियंत्रकांच्या निदर्शनास काही बाबी आणून दिल्या. त्यामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी गुणांकनाच्या सदोष पद्धतीमुळे अनुत्तीर्ण झाले आहेत. उत्तरपत्रिकांच्या (ओएमआर शीट) सदोष निकालाची पुन्हा पडताळणी करावी, राहिलेले निकाल तात्काळ घोषित करावेत, सदोष निकालाची पडताळणी करून योग्य अचूक निकाल लावावा, किमान ५० टक्के विषयांत उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा, अनुपस्थित दाखविलेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थिती पत्रक मागवून घेऊन विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर करावा, उत्तरपत्रिकेवर बैठक क्रमांक नसल्यामुळे उत्तरपत्रिका ओळखता येत नाही, अशा विद्यार्थ्यांची हजेरी तपासून अथवा सरासरी गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करावे.
यावेळी सचिन निकम, पँथर विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे, अतुल कांबळे, गुरू कांबळे, महेंद्र तांबे, प्रवीण हिवराळे, अविनाश कांबळे, प्रबोधन बनसोडे, दिनेश नवगिरे, सोमू भटकर, चिरंजीव मनवर, अविनाश डोंगरे, अक्षय जाधव, अजय रगडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.