बीड: जल, वायु, ध्वनी प्रदूषणासह जिल्ह्यात बेसुमार वृक्षतोड होत असल्याने पर्यावरण संरक्षणाला धाब्यावर बसविले जात आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असा जप सर्वांकडून केला जात असला तरी पर्यावरणाच्या प्रदूषणाकडे नागरिकांचे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. निकोप मानवी जीवनासाठी पर्यावरण स्वच्छ राखणे गरजेचे आहे. पर्यावरणातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत जात असल्याने तापमान वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे याचा ऋतू चक्रावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती करण्यात येत असली तरी अद्यापही ठिकठिकाणी होणार्या प्रदूषणाकडे ‘चलता है’ वृत्ती ने पाहण्याची सवय झाली आहे. यामुळे पर्यावरणाचा दिवसेंदिवस अधिक ºहास होत आहे. बीड शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी म्हणजे बीडकरांची शान आहे. मात्र नदी आता घाणीच्या विळख्यात सापडली असून येथे प्रचंड जलप्रदुषण होत आहे. या नदीमध्ये शहरातील अनेक नाल्यांचे पाणी सर्रास सोडले जात आहे. त्यामुळे या नदीला नाल्याचे स्वरुप आले आहे. विशेष म्हणजे या गंभीर बाबीकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ असल्याचे दिसून येत नाही. नदीमध्ये नाल्यांतील घाण पाण्यासह अनेक औद्योगिक वसाहतीतील प्रक्रिया केल्यानंतर टाकाऊ असलेले पाणीही नदीत सोडले जात आहे. बिंदुसरा नदीमध्ये परिसरातील अनेकांच्या कूपनलिकांना मुबलक पाणी असते. मात्र नदीमधून सतत घाण पाणी वाहत असल्याचे याचा परिणाम इतर पाण्यावरही होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ललित अब्बड यांनी सांगितले. बिंदुसरा नदीबध्ये पडलेल्या इमारतींचा मलबा, घर, हॉटेल, भाजी मंडई येथील टाकाऊ कचरा यासह इतर टाकाऊ पदार्थ सर्रास टाकण्यात येतात, यामुळे नदीला ‘सार्वजनिक उकांड्या’चे स्वरुप आले आहे. शहरातील कोणात्याही नागरिकांच्या घरातील टाकाऊ कचरा बिनदिक्कत नदीत टाकण्यात येत असल्याने नदीचे पात्र धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा साखळी सांभाळण्यात नद्यांचे मोठे महत्त्व आहे. याची नागरिकांना वारंवार जाणीव करून दिली तरी याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांतून होत आहे. बिंदुसरा पात्राचे सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी दोन वर्षापूर्वी पालिकेने लाखो रुपये खर्च केले. यांनतर काही दिवस लोटत नाही तोच ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी अवस्था झाली आहे. आजही नदीपात्रात जलपर्णी वाढल्या आहेत. यासह नदीपात्रात बाभळींसह इतर झुडुपेही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गंभीर बाब म्हणजे नदीपात्रात व नदीलगत अनेकांनी वीट भट्ट्या सुरू केल्या आहेत. यामुळेही नदीचे पात्र धोक्यात आले आहे. एकंदरच या सर्व बाबींमुळे बिंदुसरा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीला आजच नाल्याचे स्वरुप आले आहे. काही काळाने येथील अतिक्रमण वाढून नालाही नष्ट होऊ नये, अशी भीतीही नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पर्यावरणाच्या समतोलासाठी नदी, जल प्रदुषण थांबविणे गरजेचे आहे. मात्र अशा महत्त्वाच्या दुव्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष असल्याने जलप्रदुषणात वाढ होत आहे. (प्रतिनिधी) वाढत्या औद्योगिकरणामुळे वातावरणातील उष्मा वाढणे हा शास्त्रज्ञासाठी जसा चिंतेचा विषय आहे तसाच तो देशाची रहाट गाडी चालविणार्या प्रशासनासमोरही प्रश्न आहे. पर्यावरण प्रदूषणामुळे बाल आरोग्यावर सर्वात लवकर परिणाम होतो. जिल्ह्यातील बिंदुसरा, वाणा, सिंदफणा, करपरा आदी नद्यांमध्ये गटाराचे पाणी सोडणे आणि घनकचर्याचा डेपो यामुळे जलप्रदुषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. हवेतील कार्बनडायआॅक्साईड वाढल्यामुळे त्याचा सर्वात जास्त परिणाम हा दमेकरी लोकांवर होता. त्यातच भर म्हणून जर शहराच्या नजीकच वीट भट्ट्या असल्या तर त्याच्या धुरामुळे आजुबाजुच्या वसाहतीतील लोकांच्या श्वसनाच्या तक्रारी वाढू लागतात. मानवी आरोग्य सांभाळण्यासाठी पर्यावरण संरक्षण महत्त्वाचे असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. द्वारकादास लोहिया म्हणाले.
पर्यावरण संरक्षणाची ऐशी तैशी
By admin | Updated: June 5, 2014 00:11 IST