बरे होताच मातेने दिले मुलाला नवे आयुष्य
आई-मुलाची ताटातूट टळली : मुलाला कोरोना होण्याचा धोकाही टळला, प्रकृती चांगली
औरंगाबाद : एका २२ वर्षीय मुलाची किडनी खराब झाल्याने त्याच्या आईने त्याला स्वत:ची किडनी देण्याचा निर्णय घेतला. पण ऐन प्रत्यारोपणाच्या एक दिवस आधी सर्जनला कोरोना झाला आणि शस्त्रक्रिया टळली. काही दिवसांनी अन्य सर्जनकडून प्रत्यारोपण होणार, त्याच वेळी या मातेला कोरोनाचे निदान झाले. नियतिने आई-मुलाची ताटातूट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण म्हणतात ना आईचे वात्सल्य कधी पराभूत होत नाही. कोरोनाला मात देत या मातेने मुलाला किडनी देऊन त्याला नवे आयुष्य दिले.
हिंगोली जिल्ह्यातील ४५ वर्षीय माता आणि २२ वर्षीय मुलाचा हा संघर्ष मातृत्वाची परिसिमा गाठणारा ठरला. शहरातील एमआयटी हास्पीटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेसह कोरोना काळात येथे ६ किडनी प्रत्यारोपण झाले. पण ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी अभूतपूर्व आव्हानात्मक ठरली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत या आई-मुलाला मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. याप्रसंगी प्रा. मुनीष शर्मा, डॉ. सुहास बावीकर, डॉ. राजेंद्र प्रधान, डॉ. शरद सोमाणी, डॉ. अतुल सोनी, डॉ. अजय ओसवाल, डॉ. प्रशांत दरख, डॉ. राजेश साऊजी, डॉ. प्रमोद अपसिंगेकर ,डॉ. बालाजी आसेगावकर आदी उपस्थित होते.
कोविड रुग्णही अवयवदान करू शकतात, ही बाब महत्वपूर्ण असल्याचे यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
ज्या सर्जनला प्रत्यारोपणाची परवानगी मिळते, त्यांनीच ते करणे बंधनकारक आहे. परंतु सर्जनला कोरोना झाल्याने अन्य सर्जनची परवानगी घ्यावी लागली. त्यात काही दिवस केले. त्यानंतर दाता असलेल्या आईलाच कोरोना झाला. बरे झाल्यानंतर आईने मुलाला किडनी दिली. यासह रक्तगट जुळत नसतानाही प्लाझा थेरपी करून एका रुग्णावर किडनी प्रत्यारोपण यशस्वी करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
या कोविडमुक्त दात्याचे किडनी दानासंदर्भात डॉ. सुहास बावीकर यांनी तयार केलेल्या शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळाले आहे. अशाप्रकारे अवयदान केल्यानंतर प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तीला कोरोना होईल का, किडनीत कोरोनाचे विषाणू असेल का, अशी भिती होती. परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही. देशात १५ सेंटरवर असे प्रत्यारोपण झाल्याचे डॉ. बावीकर म्हणाले.