रब्बीचा हंगाम म्हटला की, गहू, हरभरा या पिकांसोबतच सूर्यफूल पीक सुद्धा पूर्वीपासून घेतले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बनकिन्होळा परिसरात सूर्यफुलाचे पीक दिसेनासे झाले आहे. हे पीक घेताना घ्यावी लागणारी दक्षता, वातावरणात गेल्या काही वर्षांपासून सततचा होणारा बदल, सूर्यफूल तेलाची दरवर्षी घटत जाणारी मागणी, इतर पिकांकडे वाढत जाणारा कल या सर्व कारणांमुळे शेतकरी सूर्यफुल पिकाकडे पाठ फिरवत चालला आहे. तसेच परागीकरणासाठी मधमाशांची संख्या देखील कमी झाल्याने परिसरातून सूर्यफूल पीक दिसेनासे झाले होते. यंदा पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने अनेक शेतकरी सूर्यफूल पिकाकडे वळले आहेत. हे पीक सध्या बहरात असून सूर्यफुलाची पिवळी मनमोहक फुले सर्वांचे लक्ष वेधत आहेत.
फोटो :
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा परिसरात रब्बी हंगामात बहरलेले सूर्यफुलाचे पीक. (छाया : केशव जाधव)