औरंगाबाद : महापालिकेतील नगरसेवकांची मागील ४ वर्षांपासून शिल्लक राहिलेली सुमारे १०१ कोटी रुपयांची कामे वर्ष २०१४-१५ च्या बजेटमधून कापण्यात आल्यामुळे सर्व नगरसेवकांचा तीळपापड झाला आहे. आज महापौर कला ओझा यांच्या दालनात झालेल्या बैठकीत युतीच्या नगरसेवकांनी कामे होत नसल्याची ओरड करून पदाधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचे खापर फोडले. बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नसून आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची उद्या ७ रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर शिल्लक कामे आणि बजेटमधील किती कामे करावयाची याचा निर्णय होणार आहे. विकासकामांचे अर्थकारण हे पुढील निवडणुकीच्या खर्चात दडलेले आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षात दोन-चार विकासकामे झाली तर त्याचा अर्थपूर्ण फायदा मनपाच्या निवडणुकीत होईल. काही पदाधिकाऱ्यांनी स्वार्थासाठी कामांवर गदा आणल्यामुळे नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. काही ज्येष्ठ नगरसेवक वगळता सर्व नगरसेवकांची कामे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. महापौरांच्या दालनातील बैठकीला उपमहापौर संजय जोशी, सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, गटनेने मीर हिदायत अली, अनिल जैस्वाल, सूर्यकांत जायभाये, नितीन चित्ते, बन्सीलाल गांगवे यांची उपस्थिती होती. कशावरून आहे वाद?यावर्षीच्या बजेटमध्ये २२५ कोटी रुपयांची शिल्लक कामे होती. ती कामे बजेटमध्ये आली आहेत. मात्र, त्यामध्ये पुन्हा वॉर्डनिहाय कामांच्या याद्या घुसडल्या. २२५ कोटींची कामे ३२६ कोटींवर गेली. ही कामे कुणी घुसडली आणि त्यातील १०१ कोटींची कामे कुणी रद्द केली, यावरून वाद सुरू आहे.