लातूर : गेल्या दोन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. यामुळे जिवाची काहिली होत असून, मंगळवारी ४३.५ अंश सेल्सिअस तापमान होते. बुधवारी त्यात पुन्हा ०.५ ने वाढ झाली असून, ४४ अंशांवर तापमानाचा पारा चढला आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमान वाढत गेले आहे. १६ मे रोजी ३९.५, १७ मे रोजी ४०.४०, १८ मे रोजी ४१.५, १९ मे रोजी ४३.५ आणि बुधवारी २० मे रोजी ४४ अंशांवर तापमान गेले आहे. ही नोंद औराद शहाजानीच्या हवामान केंद्रावर झाली आहे. बुधवारच्या पाऱ्यामुळे दिवसभर जिवाची काहिली झाली. पंखे, कुलर्स व एसी लावूनही उन्हापासून दिलासा मिळू शकला नाही. मंगळवारपासून हा पारा चढला आहे. यामुळे बुधवारी शहरातील रस्ते सकाळी १० वाजेपासूनच निर्मनुष्य होते. बाजारपेठेत शुकशुकाटच होता. सायंकाळी ७ वाजले तरी वातावरणातील उष्णतेची धग कायमच होती. त्यामुळे बुधवारी बाजारपेठेत सायंकाळीही ग्राहकांची वर्दळ कमीच होती. या उष्म्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असून, डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. (प्रतिनिधी)
सूर्य आग ओकतोय; लातूरचा पारा पुन्हा ०.५ अंशांनी वाढला !
By admin | Updated: May 21, 2015 00:30 IST