औरंगाबाद : अभियांत्रिकीच्या परीक्षेत अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या विद्यार्थ्याने खडकेश्वर येथील हुबळीकर लॉजमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. दत्ता जनार्दन पाले (२३, रा. पालखेड, ता. वैजापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो जटवाडा रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या (संगणक) शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, दत्ता पाले हा काही वर्षांपासून अभियांत्रिकीची परीक्षा देत होता. पण, त्याला अपेक्षित यश मिळत नव्हते. आता त्याची या महिन्यात परीक्षा होती. शेवटच्या वर्षाला पास होतो की नाही, या द्विधा अवस्थेत असलेला दत्ता पाले हा दोन दिवसांपासून (३१ मे) हुबळीकर लॉजमध्ये एक रूम घेऊन राहत होता. लॉजमधील कर्मचार्यांना दत्ता पाले हा पहिल्या दिवशी अनेकदा दिसला. मात्र, तो काल १ जूनपासून रूमच्या बाहेर आलाच नाही. ही बाब आज सकाळी कर्मचार्यांना खटकली. त्यांनी व्यवस्थापकाशी यासंबंधी चर्चा केली. तेव्हा व्यवस्थापकाने दत्ता राहत असलेल्या १०५ क्रमांकाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला; पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे व्यवस्थापकाला शंका आली. त्यांनी तात्काळ ही घटना सिटीचौक पोलिसांना कळविली. सिटीचौक ठाण्याचे सहायक फौजदार एस. आर. देशपांडे व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दत्ता पाले हा बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याच्याजवळ विषाची बाटलीही होती. पोलिसांनी दत्ता पाले यास घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी सिटीचौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक देशमुख हे तपास करीत आहेत.
विद्यार्थ्याची लॉजमध्ये आत्महत्या
By admin | Updated: June 3, 2014 01:10 IST