हणमंत गायकवाड लातूरमागील चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे सर्वसाधारण ४५ हजार हेक्टरवर असलेली ऊस लागवड ६ हजार हेक्टरवर आली होती. यंदा सरासरीपेक्षा पाऊस अधिक झाल्याने पाण्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. मात्र बेण्यांची अडचण निर्माण झाली असून, लातूरसह परजिल्ह्यातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर येथून बेणे आणले जात आहे. काही कारखान्यांनीही बेणे उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असून, जिल्हा बँकेने ऊस लागवडीसाठी १०० कोटींचा पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा पाचपट ऊस लागवड होईल, असा अंदाज आहे. लातूर जिल्ह्यात ११ कारखाने आहेत. त्यापैकी गतवर्षी ५ कारखान्यांचे गाळप झाले. यंदा फक्त दोन कारखाने सध्या चालू झाले आहेत. या कारखान्यांनाही जिल्ह्यात पुरेसा ऊस उपलब्ध नाही. पाणी नव्हते. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. सोयाबीनची काढणी होताच शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. ६ हजार हेक्टरवर असलेली ऊस लागवड आता ३० हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. एकंदर, पाचपट अधिक क्षेत्र यंदा ऊस लागवडीखाली येणार आहे. मात्र बेण्याचे भाव वधारल्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत आहे. साडेतीन हजार ते ४ हजार रुपये टनाने बेणे खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. २६६, २६५, ८६०३२, ६७१ आदी जातींचे बेणे जिल्ह्यात मिळणे मुश्किलीचे झाले आहे. २६६, २६५ या जातीचे बेणे १४ महिन्यांनंतर तोडणीला येते. तर ६७१ बेणे नऊ महिन्यांनंतर तोडणीला येते. ६७१ जातीच्या बेण्याच्या साखरेची रिकव्हरी अतिशय चांगली आहे. त्यामुळे कारखाने ६७१ जातीचा ऊस उचलायला पसंती देतात. त्यामुळे या बेण्यासाठीच कारखान्यांनी सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु, शेतकरी २६५, २६६, ८६०३२ या जातींच्या बेण्यांंना पसंती देत आहेत. या व्हरायटी १२ ते १४ महिन्यांच्या असल्या तरी वजनाला चांगल्या आहेत. उताराही बरा आहे. त्यामुळे शेतकरी या जातीच्या बेण्यांना अगोदर पसंती देत आहेत. या जातीचे बेणे जिथे आहेत, तिथे जाऊन खरेदीसाठी अनामत देऊन बेणे बुक करीत आहेत. परंतु, भाव अव्वाच्या सव्वा असल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यात जवळपास या जातीचे बेणे उपलब्ध नसल्याने सोलापूर, सांगली, कोल्हापूर व माढा परिसरात काही शेतकरी जाऊन आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात ५ ते ६ हजार प्रति टनाने अनेक शेतकऱ्यांनी बेण्याची बुकिंग केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
उसाचे क्षेत्र पाचपटीने वाढणार; बेण्याचा तुटवडा
By admin | Updated: November 3, 2016 01:35 IST