उस्मानाबाद : शिवसेनेचे उमेदवार अॅड. विशाल साखरे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार युवराज नळे यांनी एकमेकांच्या उमेदवारी अर्जाविरूद्ध आक्षेप घेत उच्च न्यालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले असता, न्यायालयाने एकमेकांविरूद्धचे आक्षेप फेटाळून लावत पक्षाचे उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. राष्ट्रवादीचे प्रभाग ९ (अ) मधील उमेदवार युवराज नळे यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेचे उमेदवार विशाल साखरे यांनी दाखल केलेला आक्षेप यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळला होता. या निर्णयावर साखरे यांनी जिल्हा न्यायालयात अपील केले होते व तिथेही त्यांचे फेटाळले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सदर निकालाविरूध्द याचिका दाखल केली होती. सदरील याचिकाही खंडपिठाने फेटाळली व युवराज नळे यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेले नामनिर्देशनपत्र वैध असल्याबाबत निर्णय दिला. युवराज नळे यांच्या वतीने अँड. वसंतराव साळुंके यांनी युक्तीवाद केला. दम्यान, शिवसेनेचे उमेदवार अॅड. विशाल साखरे यांनी शिवसेनेच्या वतीने दाखल केलेला पाचवा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात यावा, यासाठी युवराज नळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली असता, न्यायालयाने नळे यांची याचिका फेटाळून लावली व साखरे यांचा शिवसेनेचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निर्णय दिला. साखरे यांच्या वतीने अॅड. संतोष चपळगावकर यांनी काम पाहिले. या निर्णयामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
साखरे अन् नळेंना दिलासा
By admin | Updated: November 19, 2016 00:37 IST