कडा : आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील बसचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. वेळेवर बस न आल्याने विद्यार्थ्यांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अवलंब करावा लागतो. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंडही बसत आहे. आष्टी व कडा येथे शिक्षणाची सोय असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर दररोज एस.टी. बसने ये- जा करीत असतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक पास असल्याने बस भाडेही अल्प लागते. यामुळे विद्यार्थ्यांना एस.टी.कडे ओढा मोठ्या प्रमाणावर आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसात कडा ते देऊळगाव घाट, आष्टी ते सावरगाव, आष्टी ते डोईठाण, कडा ते देवळाली, कडा ते हातवण यासह इतर काही बस वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. सकाळी आठ, साडेआठ व नऊ वाजता सुटणारी बस कधी-कधी अर्धा ते एक तास तर सायंकाळी ४ ते ५ दरम्यान सुटणाऱ्या बसही उशिरा सुटतात. यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यास व घरी येण्यासही उशिर होतो. यामुळे वेळेवर बस सोडण्याची मागणी राजेश शिंदे, सचिन चौगुले, अशोक चौगुले यांनी केली. याबाबत आगार प्रमुख सचिन शिंदे म्हणाले बस वेळेवर सोडण्यात येतील. (वार्ताहर)
वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांचे हाल
By admin | Updated: July 19, 2014 00:40 IST