औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी १२ वी हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे १२ वीनंतर करिअरसाठी कोणत्या क्षेत्राची निवड हे या टप्प्यात महत्त्वाचे ठरते. पालक म्हणतात म्हणून, आपला मित्र गेला म्हणून विद्यार्थ्यांनी एखाद्या क्षेत्राची निवड करू नये. स्वत:च्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वत:चा कल आणि आवडीचा विचार करूनच विद्यार्थ्यांनी एखाद्या क्षेत्राची निवड केली पाहिजे, असा करिअर मंत्र देत तज्ज्ञांनी रविवारी ‘गीतम स्कॉलर-२०१६’ या करिअर मार्गदर्शन चर्चासत्रात विद्यार्थ्यांना यशाचे रहस्य उलगडून सांगितले.लोकमत व गीतम युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘लोकमत भवन’ येथे ‘गीतम स्कॉलर-२०१६’ या करिअर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रास मार्गदर्शक म्हणून हैदराबाद येथील गीतम युनिव्हर्सिटीचे सहायक प्रशासकीय संचालक डॉ. के. शिव कुमार, पुणे विद्यापीठाचे सहायक प्रोफेसर वैभव जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी गीतम युनिव्हर्सिटीचे सहायक प्रोफेसर आरेफ महंमद अब्दुल यांची उपस्थिती होती. सहायक प्रोफेसर वैभव जोशी म्हणाले, १२ वीनंतर करिअरची निवड करताना पालकांनी सांगितले म्हणून, मित्र गेला म्हणून एखाद्या क्षेत्राची निवड करू नये. पालकांनी आपला निर्णय विद्यार्थ्यांवर लादू नये. डॉ. के. शिव कुमार म्हणाले, १२ वी म्हणजे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य करिअरची निवड केली पाहिजे. यावेळी त्यांनी गीतम युनिव्हर्सिटीमधील विविध अभ्यासक्रम आणि त्यातील संधींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी उलगडले यशाचे रहस्य
By admin | Updated: January 17, 2016 23:56 IST