जालना : नगर पालिका कर्मचाऱ्यांचा संप चार दिवसांपूर्वी संपला. ईद तोंडावर असतांनाही पालिकेचा स्वच्छता विभाग आळशीपणा झटकून कामाला लागण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांतून पालिकेविषयी प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. अनेक भागात अजूनही पालिकेचे स्वच्छता कर्मचारी पोहोचले नाहीत. स्व. पापाखान यांच्यानंतर दु:खीनगरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दु:खीनगर वासियांची एवढी भयानक परिस्थिती आहे की, सर्वच गटारे तुंबली आहेत. कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सर्वत्र चिखल माजला आहे. टोलेजंग इमारतींचा हा उच्चभ्रू वस्तीचा भाग अस्वच्छतेमुळे आता दुर्गंधीचा अड्डा बनला आहे. या भागातील नागरिक पालिकेच्या कारभारावर प्रचंड नाराज आहेत. मदिना चौक, कुरेशी मोहल्ला या भागात तर पायी चालणे अतिशय अवघड होऊन बसले आहे. गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. घाण व कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. चंदनझीरा भागातही प्रचंड कचरा साचला आहे. आ. गोरंट्याल यांच्या प्रयत्नातून एक चांगला रस्ता तयार करण्यात आला आहे. या भागात अलिकडच्या काळात औद्योगिक वसाहतीमुळे मुस्लिम वस्ती वाढली आहे. ईदचा असूनही पालिकेच्या वतीने या भागात कचऱ्याचे ढीग उपसण्यात आले नाहीत. पेन्शनपुरा या भागात प्रचंड मोठा कचऱ्याचा ढीग साचला आहे. गेल्या महिनाभरापासून हा ढीग उचलण्यात आला नाही. मुख्य रस्ता असूनही कचरा उचलण्यात आलेला नाही. या भागातील लोकांना रमजान महिन्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. तक्रार करूनही कोणीच दखल घेत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. पालिकेच्या स्वच्छता विभागाने तर हा भाग वाळीत टाकल्याचे जाणवत आहे. छाईपुरा रहेमानगंज भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. ईदगाहपासून हा भाग अगदी जवळ आहे. या ठिकाणाहून ईदगाहसाठी जाणाऱ्यांना मुख्य मार्ग आहे. मात्र ठिकणी साचलेला कचरा अजूनही उचलण्यात आला नाही. कादराबाद दर्गावेस भागात गटारीतून काढलेली घाणही आणून टाकली जाते. ईतवारा हा भाग स्वच्छ असला तरी कुच्चरवटा भागात घाणीचे साम्राज्य आहे.रमजान व श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर सफाई मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)स्वच्छता मोहीम राबविणार नगर पालिका कर्मचारी नुकतेच संपावरून परतले आहेत. संपूर्ण शहरात एकदाच सफाई केली जात आहे. टप्प्या-टप्प्याने ईदपर्यंत संपूर्ण शहर स्वच्छ केला जाईल, उपनगराध्यक्ष शाह आलम खान यांनी सांगितलेस्वच्छतेच्या कामाला गती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेळेवर कामावर येण्यासाठी स्वच्छता कामगारांवर कारवाई केली जात आहे. स्वच्छता विभागातील कामगारांचा आढावा घेतला आहे. काही भागात खाजगी व्यक्तींकडून स्वच्छता करून घेतली जात असल्याचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले.
शहरात साचले कचऱ्याचे ढिगारे
By admin | Updated: July 28, 2014 00:58 IST