वाशी : विजेच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या पारा व डोंगरेवाडी येथील संतप्त शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या उपकेंद्रास टाळे ठोकून कळंब-पारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कनिष्ठ अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर लावलेले टाळे काढण्यात आले.पारा व डोंगरेवाडी भागातील शेतामधील जळालेल्या डीपीची देखभाल करावी, जमिनीलगत लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्याची दुरूस्ती, कर्मचाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवावी, आदी मागण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळी कळंब ते पारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत ३३/११ उपकेंद्रास टाळे ठोकले. यावेळी पारगावचे कनिष्ठ अभियंता आशिष जगधने यांना आंदोलकांनी घेराव घालून वीज कंपनीच्या समस्याविषयी धारेवर धरले. तसेच वाशी येथील सहाय्यक अभियंता हे शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देत असल्याचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी तहसीलदार गोरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. आंदोलनात पारा येथील जीवनराव भराटे यांच्यासह डोंगरेवाडी येथील शेतकरी सहभागी झाले होते. पोनि शहाजी शिंदे, सपोनि विनोदकुमार मेत्रेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By admin | Updated: July 4, 2014 00:17 IST