पालम : शहरात शनिवार बाजार परिसरात भिंतीला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडल्याची घटना २८ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पालम पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शहरातील शनिवार बाजार परिसरात ग्रा़ पं़ कॉम्प्लेक्समध्ये शुक्लेश्वर किराणा दुकान आहे़ या दुकानाचे मालक नेहमीप्रमाणे दिवसभर व्यापार करून रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून घरी निघून गेले होते़ २८ जून रोजी रात्रीच्या २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूस भिंतीला भगदाड पाडले़ या भगदाडातून आतमध्ये जाऊन चोरट्यांनी माल लंपास केला आहे़ या चोरीत ८० हजार रुपये, २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, किराणा माल १० हजार असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे़ यामुळे व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे़ पोलिसांनी शहरातील गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे़ पालम पोलिस ठाण्यात हनुमंत पांडुरंग पौळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनास्थळाला सपोनि सदानंद येरेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वानपथक व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले होते़ घटनेचा तपास पोउनि बोईनवाड हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)अपुरा पोलिस कर्मचारी वर्गचोऱ्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ पोलिस स्टेशनमध्ये अपुरे कर्मचारी असल्याने तपासकामात अडथळे निर्माण होत आहेत़ मागील आठवडाभरात तब्बल चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत़ शहर व तालुक्यात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत़ पोलिस यंत्रणा तपासाचे काम करीत आहे़ चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी गावोगाव ग्रामस्थांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे़
भिंत फोडून दुकानात चोरी
By admin | Updated: June 29, 2014 00:26 IST