संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून दुचाकी, चारचाकी चालविताना वाहनचालकांची चांगलीच कसब लागते. अशा रस्त्यांवर स्वत:चे कौशल्य पणाला लावून महिला चालक एसटी चालवित आहेत. पण, सध्या हा केवळ प्रशिक्षणाचा भाग असून, दोन स्टेअरिंग असलेल्या खास बसमधून हे प्रशिक्षण सुरू आहे. महिला एसटीचालक पाहून रस्त्यावरील अन्य वाहनचालकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद आणि नाशिक प्रदेशासाठी चालकपदासाठी ३२ महिलांची निवड करण्यात आली आहे. यात औरंगाबाद विभागातील ६ महिलांचा समावेश आहे. निवड झाल्यानंतर या महिलांना १०० दिवसांचे वर्ग प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानंतर आता २०० दिवसांचे बस चालविण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. एसटी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) अनंत पवार आणि २५ वर्षे एसटी चालविण्याचा अनुभव असलेले चालक एकनाथ गायकवाड हे सध्या या महिलांना बस चालविण्याचे प्रशिक्षण देत आहे. दोन स्टेअरिंग, दोन्हीकडे ब्रेक, अवघ्या काही दिवसांतच अनेक महिलांचा ‘स्टेअरिंग’वर हात बसला आहे. रस्त्यावर बस चालविताना कधी अचानक दुचाकी समोर येते, तर कधी रिक्षा. पण, अशा परिस्थितीतही अगदी सहजपणे या महिला बसवर नियंत्रण मिळवितात. प्रशिक्षणाचे अन्य टप्पे बाकी आहे. हे टप्पे पार केल्यानंतरच या महिला प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत. परंतु, प्रशिक्षणादरम्यान या महिलांची जिद्द आणि परिश्रम पाहता सर्व टप्पे पार पाडून त्या प्रवाशांना घेऊन बस चालवतील, अशी आशा व्यक्त होत आहे. विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्यासह एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन मिळत आहे.
रस्त्यावरील वाहतुकीची भीती नाही
महिला आज विमान, रेल्वे चालवित आहेत. एसटी चालविताना रस्त्यावरील वाहतुकीची कोणतीही भीती वाटत नाही. महिलांनी पुढे येऊन काहीतरी वेगळे करून दाखविले पाहिजे. एसटी चालक होण्यासाठी कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला.
- पल्लवी बेलदार, प्रशिक्षणार्थी चालक
------
फोटो ओळ...
शहरातील रस्त्यावर एसटी बस चालविताना महिला चालक.