लातूर : लातूर शहर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलेले आहे. निधीची टंचाई असल्याची ओरड होत असताना शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री यांनी २०१३-१४ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१४-१५ चे प्रस्तावित अंदाजपत्रक महासभेपुढे सादर केले. लातूरच्या इतिहासात प्रथमच ४७८ कोटी ५० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न, कर्ज, असाधारण जमा, भांडवली जमा व केंद्र शासनाचे अनुदान मिळून ४७८ कोटी रुपयांचा ताळमेळ घालण्यात आला आहे. तर अपेक्षित खर्चातून १ कोटी ८४ लाख रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक हे शिलकी अंदाजपत्रक आहे. स्थायी समितीच्या सभापतींनी सादर केलेला अर्थसंकल्प हा कसल्याही प्रकारची करवाढ न करता सादर केलेला आहे. यावर विरोधी पक्षाने वस्तुस्थितीला अनुसरून अर्थसंकल्प मांडण्यात आला नसल्याची टीका केली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी सदस्यांनी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींचे समर्थन केले आहे. स्थायी समितीने तयार केलेला हा अर्थसंकल्प शुक्रवारी सभागृहात सादर करण्यात आला आहे. यावर अभ्यास केला जाईल. त्यानंतर १५ दिवसांनी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात येणार आहे.अल्पदरात सुरक्षित प्रवासाचे साधन उपलब्ध... जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेला केंद्र शासनाकडून ६० सिटी बसेससाठी अनुदान मिळाले आहे. सिटी बसस्थानके विकसीत करणे, देखभाल दुरुस्ती केंद्र उभे करणे आदींचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून ८० टक्के निधी व राज्य शासनाकडून २० टक्के निधी प्राप्त होणार आहे. आगामी काळात लातूर शहरातील नागरिकांना अल्पदरात व सुरक्षित प्रवासाचे साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. मनपा रुग्णालयात नवजात शिशु विभाग...पटेल चौकातील पंडित जवाहरलाल नेहरू मनपा रुग्णालयात प्रत्येक महिन्यास साधारणत: ६० ते ७० प्रसुती होत असतात. प्रत्येक शुक्रवारी गरोदर मातांच्या तपासणीचा जो निश्चित दिवस आहे, त्या रोजी साधारणत: १०० ते १५० गरोदर माता तपासणीसाठी येत असतात. वरील प्रमाणे मनपा रुग्णालय येथे प्रामुख्याने गरोदर महिलांची संख्या अधिक प्रमाणात आहे. त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तथापि, प्रसुती झाल्यानंतर आजारी बाळांचा आवश्यकतेप्रमाणे उपचार करण्यासाठी तसेच इतर लहान मुले आजारी पडल्यानंतर त्यांचा उपचार करण्यासाठी मनपा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ व बालरोग विभाग नसल्याने बाल रुग्णांची सुविधा होत नाही. मनपा रुग्णालयात बालरोग विभाग सध्या उपलब्ध असलेल्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील वापरात नसलेल्या हॉलमध्ये कार्यान्वित केल्यास व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवल्यास बालरुग्णांची सोय होणार आहे. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी आजारी शिशु काळजी विभाग चालू करता येऊ शकेल. याकरिता अंदाजपत्रकात तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आॅपरेशन थिएटर...पटेल नगर येथील मनपाच्या रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा नेत्रचिकित्सक यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत मंगळवार, बुधवार व गुरुवारी प्रामुख्याने ४० वर्षांवरील रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येते. याअंतर्गत आतापर्यंत २७ मोतीबिंदूचे रुग्ण शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहेत. याच रुग्णालयात नेत्र रुग्णांची सोय व्हावी म्हणून आवश्यक उपकरणे, शस्त्रक्रियेसाठी लागणारा स्टाफ व अन्य सुविधा देण्याची तरतूद अर्थसंकल्पात आहे. मोतीबिंदू व डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृह या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यातून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याकरिता अंदाजपत्रकात प्रस्तावित तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी २० वर्षांचा आराखडा...शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, यासाठी पर्यावरण धोरण राबविणे, वृक्ष गणना करणे, आरक्षित उद्यान विकसीत करणे तसेच उद्यान विकासाचा पुढील २० वर्षांचा आराखडा तयार करण्यासाठी प्रस्ताव बनविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अंदाजपत्रकात आवश्यक ती तरतूद करण्यात आली आहे. शहराच्या विकास कामांना गती येणार...महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक असली, तरी आगामी काळात विकासाचा वेग मंदावणार नाही, याची काळजी अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. चांगले अर्थनियोजन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, शहरवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता प्रगतीच्या दिशेने वाटचाल आणि नागरी सुविधांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला आहे. लातूरच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असावा. तब्बल ४७८ कोटी ५० लाख रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. सदरील अंदाजपत्रकात प्राप्त होणारे महसुली उत्पन्न, शासनाकडून मिळणारे अनुदान, केंद्र शासनाचे विशेष अनुदान यातून प्राप्त होणारा निधी, शहरातील पायाभूत सुविधा विकसीत करणे, दळणवळण सुविधा निर्माण करणे, दलित वस्त्या सुधार, महिला व बालकल्याण, शिक्षण विभाग, शहर सफाई, नागरी आरोग्य, पर्यावरण संतुलन, रस्ते व नाल्या यांची निर्मिती, दिवाबत्ती सेवा कर आदी कामांवर खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व समाजघटकांचा विकास साधून शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.-अख्तर मिस्त्री, सभापती स्थायी समिती
तिजोरीत खडखडाट; १.८४ कोटी शिल्लक
By admin | Updated: July 26, 2014 00:38 IST