वाळूज महानगर : चोरट्यांनी टायर्स शोरूमचे शटर उचकटून २७ टायर्स व जवळपास २ लाख रुपयांचे कपाशीचे बियाणे लंपास केले.शंकर दलसिंग राजपूत (रा. रामराईवाडी, ता. गंगापूर) यांचे औरंगाबाद- अहमदनगर मुख्य मार्गावरील वाळूज येथे विराज टायर्स शोरूम आहे. ७ जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्याचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. ते न तुटल्यामुळे त्यांनी दुकानाचे शटर उचकटले. एमआरएफ, अपोलो, सिएट, अमर डीलक्स आदी कंपन्यांचे ट्रक, ट्रॅक्टर, दुचाकीचे २७ टायर्स त्यांनी नेले.पोलीस निरीक्षक अशोक कदम, सहायक फौजदार एस. बी. बनकर, पोहेकॉ. सोपान मोहिते, संजय जऱ्हाड, संदीप राशीनकर, कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाचे व्ही. एल. हरणे, राऊत, श्वान नीलिमा तसेच ठसे तज्ज्ञ सहायक पोलीस निरीक्षक संजय बिरुटे यांना पाचारण केले होते. श्वान घटनास्थळीच घुटमळल्यामुळे चोरटे वाहनातून गेले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.दुकानमालकाकडे स्टॉक रजिस्टरमध्ये नोंद नसल्यामुळे ६२ हजार ३०० रुपयांचाच ऐवज चोरीस गेल्याची नोंद झाली आहे. तपास सहायक उपनिरीक्षक संजय बनकर करीत आहेत.दुकानातील कपाशीच्या बियाणांच्या प्रत्येकी १८ हजार रुपये किमतीच्या जवळपास १० ते १२ पेट्याही लांबविल्या. सकाळी हा प्रकार शेजारच्या व्यावसायिकांनी शंकर राजपूत यांना सांगितला. त्यांनी तातडीने वाळूज पोलिसांना चोरी झाल्याची ही माहिती दिली.
वाळूजला टायर्स शोरूममध्ये चोरी
By admin | Updated: June 9, 2014 01:09 IST