जालना : संपूर्ण भारतामध्ये स्वच्छता अभियान जोमाने राबविण्यात येत असून, आपला महाराष्ट्र स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ५० ते ६० टक्के महिलांचा सहभाग असलेल्या स्वच्छता दुतांची संपूर्ण राज्यभर नियुक्ती करण्यात येणार असून, या राष्ट्रीय कार्यात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.परतूर येथील श्याम मंगल कार्यालयात आयोजित महिला बचत गटाच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य राहूल लोणीकर, समाजकल्याण सभापती शहाजी राक्षे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बशीर पटेल, पद्माकर केंद्रे, पाणी पुरवठा विभागाचे आर.एन. तांगडे, उप विभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, तहसीलदार गुंडमवार, छाया पवार, लोणीकर, जगदीश नागरे, गजानन शास्त्री, मुकुंद तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की, राज्यातील विविध बचतगटे, स्वयंसेवी संस्था, सुशिक्षीत बेरोजगार तसेच इतर संस्थेत सध्या मानधनावर काम करणाऱ्या पुरूषांप्रमाणेच विशेषत: ५० ते ६० टक्के महिलांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. एका वर्षाच्या १५० शौचालयांची कामे पूर्ण करणाऱ्या स्वच्छता दुतास प्रती शौचालय १५० रुपये या प्रमाणे एकूण संपूर्ण वर्षात २२ हजार ५०० रुपये मानधन म्हणून देण्यात येणार आहे. यात विशेषत: महिलांचा सहभाग राहणार असून, हे स्वच्छता दूत गावातील जनतेला स्वच्छतेविषयी महत्त्व पटवून देऊन शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करेल.राज्यातील ५६ लाख कुटुंबांना येत्या ४ वर्षात शौचालये बांधून देण्याचा शासनाचा निर्धार असून, याआधी एका शौचालयासाठी असलेल्या ४ हजार रुपयांच्या अनुदानात वाढ करून प्रत्येक शौचालयामागे १२ हजार रुपये अनुदान शासनामार्फत देण्यात येत आहे. त्यापैकी १० हजार रुपये बांधकामासाठी व २ हजार रुपये पाण्याच्या टाकीसाठी देण्यात येत आहेत. शासनाच्या या योजनेचा लाभ घे१न आपल्या घरी शौचालय बांधावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.ग्रामीण भागाचा विकास होऊन महिलांना समाजामध्ये सन्मानाने जगता यावे, तसेच महिलांच्या हाती पैसा रहावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार महिलांना बचतगटाच्या माध्यमातून संघटित करून छोट्या छोट्या उद्योगासाठी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. परतूर व मंठा या भागातील बचतगटांना येत्या काळात जवळपास ३ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्ज देण्याची जशी बँकेची जबाबदारी असते, तशीच दिलेले कर्ज वेळेवर फेडण्याची जबाबदारी बचतगटांची असल्याने बतचगटांनी आपले कर्ज वेळेवर फेडावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बचतगटांना मंजूर झालेल्या कर्जाचे धनादेश पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशीकांत मिरकले यांनी केले.
राज्यभर स्वच्छता दुतांची नियुक्ती करणार-लोणीकर
By admin | Updated: March 2, 2015 00:51 IST