औरंगाबाद : तोट्यात चालणारी बससेवा बाहेर काढण्यासाठी आणि प्रवासी वाढविण्यासाठी एस.टी. महामंडळाने सोमवारी अचानक नवा पॅटर्न राबविला. वाहतूक शाखेबरोबर आस्थापना, अकाऊंट शाखेतील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून जिल्ह्यात विविध ठिकाणी मार्ग तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामुळे विभाग नियंत्रक कार्यालयात शुकशुकाट होता.जिल्ह्यातील विविध मार्गांवर आठवडाभर मार्ग तपासणीची मोहीम राबविण्यात येणार आहे. पावसाळा हा एस.टी. महामंडळासाठी कमी गर्दीचा हंगाम असतो. ग्रामीण भागातील प्रवाशांची संख्या या कालावधीत कमी असते. त्यामुळे उत्पन्नही घटते. अशा स्थितीत तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे किंवा नियोजित थांब्यांवर न थांबण्यामुळे एस. टी. महामंडळाला उत्पन्नात आणखी तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे उत्पन्न आणि प्रवासी वाढविण्यासाठी मार्ग तपासणीची मोहीम राबविण्यात आली. ती आठवडाभर चालणार आहे. महसुलाचे नुकसान होऊ नये, वाहकांनी प्रवाशांना योग्य दराचे तिकीट देणे, प्रवाशांनी फुकटात प्रवास करू नये यासाठी मार्ग तपासणी मोहीम महत्त्वाची असते. प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांचे पथक जिल्हाभर पाठविण्यात येत आहे. सकाळी ६ ते दुपारी २ तसेच दुपारी २ ते रात्री १० अशा दोन सत्रांत पथक पाठविण्यात येत आहे. यामुळे सोमवारी अन्य दिवसांच्या तुलनेत विभाग नियंत्रक कार्यालयात कर्मचारी कमी दिसले.मोहिमेतून जनजागृती1मार्ग तपासणी मोहिमेतून उत्पन्न, प्रवासी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी मोहिमेतून प्रवाशांबरोबर कर्मचाऱ्यांमध्येही जनजागृती केली जाणार आहे.कर्मचाऱ्यांवर कारवाई2मार्ग तपासणीत अनधिकृत थांब्यावर बस थांबविणे, अधिकृत थांब्यावर बस न थांबविण्यासह कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कामावर परिणाम नाही3प्रशासकीय कामासाठी काही कर्मचारी कार्यालयात राहणार आहेत. त्यामुळे या मोहिमेमुळे प्रशासकीय कामावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी दिली.
एस.टी.चे कर्मचारी आठवडाभर मार्ग तपासणीत
By admin | Updated: July 23, 2014 00:41 IST