लातूर : बसस्थानक म्हटले की, नेहमी अस्वच्छता, एकाचवेळी वेगवेगळ्या बसच्या वेळेची माहिती मागणारे चार प्रवाशी, अशी नेहमीची धावपळ सुरु असते़ रविवारी सकाळी मात्र प्रवाशांनी वेगळाच अनुभव घेतला़ बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराशी काढण्यात आलेली रांगोळी, स्वच्छ दिसणारी आसन व्यवस्था आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रवाशाचे गुलाबपुष्प देऊन होणारे स्वागत़ यामुळे प्रवाशीच आचंबित होऊन आपण नेमके लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातच आलो आहोत की अन्य कुठल्या आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत असा भास होत होता़ निमित्त होते परिवहन दिनाचे़ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी जिल्ह्यातील प्रमुख आगारांत वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला़ लातुरातील मध्यवर्ती बसस्थानकाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली होती़ त्याचबरोबर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती़ बसस्थानकात आगमन करणारा प्रवासी आनंदी व्हावा म्हणून दर्शनी भाग फुलांनी सजविण्यात आला होता़ बसस्थानकात सकाळी आगमन केलेल्या प्रत्येक प्रवाशाचे विभाग नियंत्रक डी़ बी़ माने यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले़ यावेळी राज्य परिवहन अधिकारी एस़ एस़ रणखांब, विभागीय वाहतूक अधीक्षक एस़ टी़ मोतीबने, आगारप्रमुख युवराज थडकर, सहायक वाहतूक अधिकारी एस़ बी़ साळुंके, आऱ एस़ सोमवंशी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव नादरगे यांची उपस्थिती होती़ यावेळी प्रत्येक प्रवाशास एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देण्यात आली़ तसेच माहिती पत्रकांचे वाटपही करण्यात आले़ आगारातील प्रत्येक चालक व वाहकास प्रवाशांची सेवा करण्याची शपथ देण्यात आली़ तसेच प्रत्येक बस स्वच्छ करण्यात आल्या होत्या़ रविवारी सकाळी लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश केलेल्या प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत असल्याचे पाहून प्रवाशांत कुतूहलाचा विषय झाला होता़ दिवसभर कुठलाही प्रवासी कुठल्याही बसची माहिती विचारली असता कर्मचारी कुठलाही कंटाळा न दाखविता आनंदाने माहिती देत होते़ त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत असल्याचे पहावयास मिळाले़ दररोज अशीच सुविधा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत मार्गस्थ होत होते़ (प्रतिनिधी) प्रवाशी आश्चर्यचकित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाची बहुतांश प्रवाशांना माहिती नव्हती़ त्यामुळे बसस्थानक चकाचक, गुलाबपुष्प देऊन होणारे स्वागत हे पाहून प्रवासी आश्चर्यचकित होत असल्याचे पहावयास मिळाले़
गुलाबपुष्प देऊन झाले एस़टी़ प्रवाशांचे स्वागत
By admin | Updated: June 2, 2014 00:50 IST