औरंगाबाद : एरव्ही विद्वान, संशोधक व अभ्यासक अशी विशेषणे लागलेली माणसे शिष्ट, गंभीर आणि आत्ममग्न असतात असे चित्र असते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे मात्र याला अपवाद आहेत. संत साहित्य अभ्यासाच्या भरीव कामगिरीसह इतिहास लेखन, नाटक, कविता, अशा क्षेत्रातही त्यांनी यशस्वी मुशाफिरी केली आहे. उत्तम कीर्तनकार म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांच्या तरुण विद्यार्थ्यांनाही ते समकालीन वाटतात. आज (३ जानेवारी) पसायदान प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘शोध महाराष्ट्राचा’ या विषयावर ते बोलणार आहेत. त्यानिमित्त ‘लोकमत’ ने त्यांच्याशी साधलेला संवाद.ल्ल साहित्य संमेलनात केले जाणारे बहुतेक ठराव प्रत्यक्षात मूर्तरुपात येतच नाहीत. यावेळी काय होणार?डॉ. मोरे - हे असे होते हे खरेच. मात्र, त्यासाठी एकटा संमेलनाध्यक्ष काही करू शकत नाही. संमेलनाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या रसिकांनीही या ठरावांचे पुढे काय होते याचा मागोवा घेतला पाहिजे. हे ठराव केवळ कागदावरच राहू नयेत, यासाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. ल्ल युवा साहित्य संमेलन निधीच्या मंजुरीअभावी रखडले आहे. ते व्हावे याबाबत आपण आग्रही राहणार का? डॉ. मोरे - हो, तरुणांसाठीचे स्वतंत्र युवा साहित्य संमेलन व्हावे ही माझी पूर्वीपासूनचीच भूमिका आहे. या संमेलनात मी ती आग्रहीपणे मांडणार आहे. सोबतच अखिल भारतीय साहित्य संमेलनही तरुणांना आपलेसे वाटावे असा माझा प्रयत्न आहेच. ल्ल आजचा तरुण आणि वाचन संस्कृती यांचे नाते कसे आहे, असे तुम्हाला वाटते?डॉ. मोरे - मी तसा सतत तरुणांमध्ये वावरत असतो. त्यातील बहुतेकांना संत साहित्य, त्यातील संशोधन, गंभीर अभ्यास विषय यात रुची असल्याचे मला जाणवते. तरुण काय वाचतो यापेक्षा त्याला वाचण्याजोगे सकस काय दिले जाते हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो आणि हो, आजचा तरुण तंत्रप्रवण आहे. थेट पुस्तके वाचत नसला तरी तो संगणक, इंटरनेट मोबाईल, अशा अनेक माध्यमातून वाचन संस्कृती समृद्ध करीत असतो. ल्ल भोवतालच्या सामाजिक प्रश्नांवर आपले साहित्यिक जाहीर भूमिका घेत नाहीत, अशी टिप्पणी केली जाते....डॉ. मोरे - लेखन हीच त्या साहित्यिकाची एक स्वतंत्र भूमिका असते, असा विचार आपण का करत नाही? लिखाणाला तो एक साधन म्हणून वापरत असतो. वैयक्तिक, सामाजिक अशी सर्व अभिव्यक्ती त्या माध्यमातून तो करतोच. अर्थात ही अभिव्यक्ती अधिकाधिक निर्भीड, स्वतंत्र व्हावी यासाठीचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले पाहिजेत. ल्ल आपण ज्या संत परंपरेचे पुरस्कर्ते आहात तिथे कर्मकांड व बुवाबाजीला कडाडून विरोध झाला. आज मात्र अध्यात्माचे विकृत आणि फसवे रूपच अधिक लोकप्रिय होते आहे, असे का होते आहे? आणि यावर उपाय काय?डॉ. मोरे - आज सगळ्याच गोष्टीत लोकांना शॉर्टकट हवा आहे. अध्यात्मिकतेचे क्षेत्रही याला अपवाद राहिले नाही. या ग्लोबल युगात अध्यात्मही चकचकीत, सेलेबल आवरणात लोकांपुढे सादर केले जाते. लोकही त्याला भुलतात. वारकरी संप्रदाय मात्र, कुठलाही शॉर्टकट सांगत नाही. अध्यात्मिकतेच्या नावावर जे काही खपवले जाते, त्याची कठोर चिकित्सा करीत राहाणे हाच यावरचा उपाय आहे.
अध्यात्मही ‘सेलेबल’ आवरणात लोकांपुढे होतेय सादर
By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST