औरंगाबाद : मणक्याची शस्त्रक्रिया म्हटली, बरेच दिवस आराम, असे वाटेल. पण घाटी रुग्णालयात एका रुग्णाची एन्डोस्कोपीकद्वारे मणक्याची शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या अनेक महिन्यांच्या वेदना एका क्षणात नाहीशा झाल्या. शिवाय रुग्णाला एक रुपयाचाही खर्च आला नाही. दुसऱ्या दिवशी त्याला ताबडतोब कामावर जाता आले.
दिलावर शेख (३४, रा. सिल्लोड) असे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नाव आहे. कुटुंबातील ६ सदस्य. मजुरी करणारा घरातील एकटेच कमावणारे. बऱ्याच वर्षांपासून सतत वजन उचलण्यामुळे त्यांच्या पाठीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर उजव्या पायाला मुंग्यादेखील येऊ लागल्या. त्यातून काम करणे अशक्य होऊ लागले. शेवटी ते खासगी रुग्णालयात गेले. ‘एमआरआर’मधून त्यांच्या मणक्याच्या एल ४-५ पातळीवर मज्जातंतू दोष (कॉम्प्रेशन) असल्याचे निदान झाले. तत्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. खासगीत मोठी रक्कम लागणार होती. त्यामुळे ते घाटी रुग्णालयात दाखल झाले. एन्डोस्कोपीक डिसटेक्टॉमीद्वारे ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. बी. लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली एन्डोस्कोपीक मणकाविकारतज्ज्ञ डॉ. अनिल धुळे आणि त्यांच्या पथकातील डॉ. प्रवीण रणवीर, डॉ. विजय कांबळे, डॉ. गौरव मते, डॉ. व्यंकटेश सोनकवडे आदींनी प्रयत्न केले.
मणक्याच्या दोन प्रकारे शस्त्रक्रिया
मणक्याच्या दोन प्रकारे शस्त्रक्रिया केल्या जातात. एक म्हणजे ओपन शस्त्रक्रिया आणि दुसरी एन्डोस्कोपीक. ओपन शस्त्रक्रियेत रुग्णाला पूर्ण भूल देण्याची आवश्यकता असते. भूली संबंधित जोखीम रुग्णाला सहन करावी लागते. रक्तस्त्राव होणे आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. वेदना आणि विच्छेदनमुळे रुग्णालयातही काही दिवस विश्रांती घ्यावी लागत असते, तर एन्डोस्कोपीक शस्त्रक्रिया ही त्वचेच्या कोणत्याही भागाला चिरा किंवा भूल न घेता केली जाते.
फोटो ओळ..
मणक्याची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णासह (मध्यभागी) घाटीतील डॉक्टर्स.