वैजापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी साफसफाईसह अन्य बाबींच्या नावाखाली बोगस देयके दाखवीत समितीच्या पैशांची उधळपट्टी करून एकाच महिन्यात साडेतीन लाख रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक संजय पाटील निकम यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. दरम्यान बाजार समितीच्या सभापतीविरुद्ध गैरव्यवहाराचा आरोप झाल्यामुळे येथील बाजार समितीतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
संजय निकम यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती भागीनाथ मगर यांनी ऑक्टोबर महिन्यात बोगस देयके जोडून तीन लाख ६७ हजार ३७० रुपयांचा गैरव्यवहार करून समितीसह शेतकऱ्यांची रक्कम हडप केली आहे. ऑक्टोबर महिन्यात बाजार समितीच्या आवारातील साफसफाईचा ठेका सुनील पेहरकर यांना देण्यात आला आहे. व्यापारी संप व टाळेबंदीच्या काळात अर्थात मार्च ते मे महिन्यापर्यंत समितीची खरेदी-विक्री बंद होती. या कालावधीत संबंधित ठेकेदाराने कोणतीही साफसफाई केली नाही. या कालावधीत सफाईचा ठेका दिलेला नसल्यामुळे व्यापाऱ्यांनीच अडत दुकानांसमोरील सफाई केली होती. त्यात सप्टेंबर महिन्यात सभापतीपदावर भागीनाथ मगर हे विराजमान झाले आणि त्यांनी लागलीच ठेकेदाराच्या नावावर ६९ हजार ६२२ रुपये बोगस उचलून गैरव्यवहार केला. या काळात कोणतेही न्यायालयीन प्रकरण सुरू नाही, तरीदेखील वीस हजार रुपये न्यायलयीन खर्च दाखविण्यात आला आहे. भेटी, प्रवासासाठी ४२ हजार ४७९ खर्च दाखविण्यात आला. साहित्य खरेदीसाठी ७१ हजार ९६० व १६ हजार ९८९ रुपये खर्च दाखविण्यात आला. इमारत दुरुस्तीसाठी एक लाख ३७ हजार असा एकूण ३ लाख ६७ हजारांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.