विशाल सोनटक्के ,उस्मानाबादइतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी भुईमूग, सूर्यफुलासह इतर पिकांकडे पाठ फिरवून सोयाबीन उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे गळीत धान्याखालील एकूण पिकापैकी ५० टक्के पेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकाच पिकाचा पेरा वाढणे, हे भविष्यासाठी मोठे संकट असल्याचे सांगत, सध्या चक्री भुंग्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. त्यातच तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मराठवाड्यातील शेती आणि शेतकरी संकटात येऊ शकतो, असा इशारा शेती क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.देशात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात होते. अलिकडील काळात मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे मोठ्या प्रमाणात वळला. राज्यात सुमारे १२ लाख पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आले असून, मागील दहा वर्षात मराठवाड्यामध्ये सोयाबीन पेऱ्याचे प्रमाण सुमारे तिपटीने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सोयाबीनद्वारे दुधासह इतर विविध प्रकारचे सुमारे दोनशे ते अडीचशे पदार्थ बनविण्यात येतात. याबरोबरच पशुखाद्यासह औद्योगिक कारखान्यांमध्ये सोयाबीनला मोठी मागणी असल्याने सध्या सोयाबीनला बाजारपेठेत दरही चांगला आहे. त्यामुळेच कोरडवाहू जमिनीचे प्रमाण अधिक असलेला मराठवाड्यातील शेतकरीही या पिकाकडे आकृष्ट झाला. मात्र एकच पीक सातत्याने घेतल्यामुळे त्या जमिनीतील ठराविक अन्नद्रव्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होतो. कालांतराने या जमिनीतून निघणाऱ्या उत्पादनातही घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन या एकाच पिकावर निर्भर राहणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षात सोयाबीन पिकावर अनेक ठिकाणी चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. याच पार्श्वभूमिवर मराठवाड्यातील सोयाबीनसमोर तांबेराचा प्रादुर्भाव झाल्यास एकूणच या भागातील शेती आणि शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभारू शकते. मध्यप्रदेशात सातत्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेतले जात होते. तिकडूनच ते महाराष्ट्रात आले. मात्र मागील काही वर्षात मध्यप्रदेशातील सोयाबीनवर तांबेराचा प्रादुर्भाव झाल्याने तेथील शेतकऱ्यांनी सोयाबीन ऐवजी इतर पिकांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. ही बाब मराठवाड्यातील शेतकऱ्यांनासाठी एक प्रकारे इशारा देणारी आहे, असे मत तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. टाकणखार यांनी व्यक्त केली. तांबेरा रोगाचे जंतू हवेमध्ये पसरू शकतात. तसेच हा रोग सोयाबीन पडल्यानंतर त्याची पाने करपतात. आणि त्यामुळे शेंगामध्ये दाणा भरत नाही. पर्यायाने उत्पादनात मोठी घट होते, अशी माहितीही त्यांनी दिली. कोणतेही एकच पीक सारखे घेणे तसेच त्यावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. यामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढतो. पूर्वी उस्मानाबाद, लातूरसह इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सूर्यफूल घेतले जात होते. सूर्यफूलवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सूर्यफूलची पेरणी कमी झाली. मागील काही वर्षात मराठवाड्यात सोयाबीनचा पेरा प्रचंड वाढला. दोन वर्षापासून सोयाबीनवर चक्री भुंग्यांचा प्रादुर्भाव होत असून, वाढते क्षेत्र पहाता तांबेरा रोग सोयाबिनवर येण्याची भीती आहे. अनुषंगाने राहुरी कृषी विद्यापीठाच्या पथकाने मराठवाड्यातील सोयाबीनची पाहणी केली. त्यावेळी तांबेरा आढळून आला नसला तरी संभाव्य संकट लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ठराविक कालावधीनंतर पिकांची फेरपालट करण्याची आवश्यकता असल्याचे तुळजापूर येथील कृषी विज्ञान संस्थेतील डॉ. व्ही. जी. टाकणखार यांनी सांगितले.
सोयाबीनचा वाढता पेरा आणू शकते संकट !
By admin | Updated: January 15, 2015 00:09 IST