औसा: खरीपातील पेरण्यांना महिनाभर उशीर झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनवर भर दिला़ परंतु, निम्म्या क्षेत्रावरील बियाणे उगवले नाही़ त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ जे बियाणे उगवले ते आता पावसाअभावी कोमेजून जात आहे़ मागील १५ दिवसांपासून पाऊस नाही़ वातावरण ढगाळ निर्माण होत असल्याने हे वातावरण आळ्यांना पोषक ठरत आहे़ परिणामी, सोयाबीनवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी धास्तावला आहे़औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबुन असलेला तालुका आहे़मागील तीन चार वर्षापासून औसा तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे़यावर्षी तर खरीपाच्या पेरण्यांना महिनाभराचा विलंब झाल्यामुळे मुग उडीद पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे़तसेच पावसाला विलंब झाल्यामुळे संकरीत ज्वारीसह खरीप हंगामातील अन्य पिकांच्या पेरण्याकडेही न वळता शेतकरी सोयाबीनकडे वळला़सध्या तालुक्यात ८५ ते ९० हेक्टरक्षेत्रावर पेरण्या झाल्या असून ५० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे़लवकर निघणारे नगदी पिक असल्यामुळे व एकाच वेळी दोन पिके घेता येत असल्यामुळे सोयाबीनच्या पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे़त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे़ एकूण क्षेत्रापैकी पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी वाढली परंतू त्यातील अर्धे बियाणे उगवले तर अर्धे बियाणे उगवलेच नाही़ त्यातच राहीलेल्या सोयाबीनवरही पाने गुंडाळणाऱ्या आळीने मोठ्या प्रमाणात हल्ला केला आहे़ढगाळ वातावरण असल्यामुळे हे वातावरण आळ्यासाठी पोषक आहे़ मोठा पाऊस झाला तर आळ्या राहणार नाहीत़ पाऊसच नसल्याने शेतकरी धास्तावला आहे़(वार्ताहर)
ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळी
By admin | Updated: August 7, 2014 01:39 IST