रमेश शिंदे , औसाऔसा तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या पेरण्यांना तब्बल महिनाभर उशिर झाला होता़ १० जुलै दरम्यान, कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ काही भागामध्ये अजूनही अपुऱ्या पावसामुळे पेरण्या झाल्या नाहीत़ तर काही ठिकाणी पेरण्या होऊन महिना उलटला तरी पाऊस झाला नाही़ परिणामी ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन धुराळा होण्याच्या मार्गावर आहे़ औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून असणारा तालुका आहे़ तालुक्यातील १ लाख २० हजार ७२० हेक्टर इतके क्षेत्र असलेल्या या तालुक्यात १ लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पिके घेतली जातात़ यावर्षी ४ आॅगस्टपर्यंत ९८ हजार ७०८ हेक्टरवर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या आहेत़ यामध्ये ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ त्याखालोखाल २० हजार ७६६ हेक्टर क्षेत्रावर तूर तर ९ हजार ५२८ हेक्टर क्षेत्रावर हायब्रीड ज्वारी ही प्रमुख पिके घेण्यात आली आहेत़ तालुक्यात एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे नद्या, नाले, विहिर, बोअर कोरडे पडले आहेत़ त्यामुळे पाणीटंचाई अजूनही कायम आहे़ रिमझिम पावसावर पिकांनी तग धरली़ पण आता पंधरा दिवसापासून पाऊस नसल्यामुळे पिके जागेवरच वाळून चालली आहेत़ एकूण ६० हजार हेक्टरवरील सोयाबीन धुराळा होण्याच्या मार्गावर आहे़ याबाबत तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सोयाबीनची पेरणी १५ जुलैपुर्वी झाली पाहिजे़ परंतु, १० जुलैला पाऊस पडल्याने पेरण्या १५ जुलैनंतर झाल्या़ त्यातच आता पावसाने उघडीप दिल्याने २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ याबाबत तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पावसाळ्याचे दोन महिने संपले आतापर्यंत ३६४ मिली मीटर पाऊस झाला पाहिजे़ परंतु, १२ आॅगस्टपर्यंत १५८ मिली मिटर पाऊस झाला आहे़ त्यामुळे आठवडाभरात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागेन, असे मतही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मंगळवारी व्यक्त केले़
६० हजार हेक्टरवरील सोयाबीनचा झाला धुराळा
By admin | Updated: August 13, 2014 01:06 IST