प्रशांत तेलवाडकर, औरंगाबादसुरांच्या दुनियेतील बेताज बादशहा मोहंमद रफी यांच्या आवाजाचे जगभर कोट्यवधी चाहते आहेत. त्यातीलच एक औरंगाबादेतील विक्रीकर विभागातील अधिकारी सुभाष पळसकर. पळसकरांसाठी मोहंमद रफी म्हणजे संगीतातील देवताच. या देवतेचे स्मरण करूनच ते घरातून बाहेर पाऊल टाकतात. आपल्यासोबत सगळ्याच रसिक श्रोत्यांना मोहंमद रफींच्या गाण्यांच्या माध्यमातून आवाजाचा आनंद घेता यावा म्हणून तब्बल १९ वर्षांपासून हा रफी दिवाना ‘यादगारे-रफी’ या नावाची मैफल कोणतेही शुल्क न घेता आयोजित करीत आहे. यासाठी पळसकर एक महिन्याचा पगार खर्च करतात. रफींच्या गायनाचा महिमा नव्या पिढीपर्यंत ते या मैफलीद्वारे पोहोचवीत आहेत. पळसकर यांच्या या उपक्रमात रफींच्या आवाजाचे अनेक चाहते सहभागी झाले आहेत. भारतीय संगीत क्षेत्रातील महागायक मोहंमद रफी यांचा ३१ जुलै रोजी ३४ वा स्मृतिदिन साजरा होणार आहे. सुभाष पळसकर सिडको एन-५ परिसरातील महाराणा प्रताप हाऊसिंग सोसायटीत राहतात. नोकरी सांभाळून ते गायनाचा छंद जोपासतात. सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये शिकत असताना सकाळी रेडिओवर मोहंमद रफींनी गायलेले भजन ऐकूनच ते शाळेत जात. तेव्हा रफींच्या आवाजाशी आणि त्यांनी गायलेल्या गाण्यांशी जुळलेला त्यांचा ऋणानुबंध आजही कायम आहे. पळसकर यांनी आपल्या बंगल्यात बैठकीच्या खोलीतच समोरील बाजूस मोहंमद रफी यांचा भलामोठा फोटो लावला आहे. ते रोज घरातून बाहेर पडताना रफींचे स्मरण करतात. रफींचा आवाज व गाणी ऐकून त्यांना गायनाची आवड निर्माण झाली. ते गुरू पं. गोपाल मिश्रा, रामभाऊ खरात, शिरीष नांदेडकर, अंजली देशपांडे यांच्याकडून गाणे शिकले. पळसकर म्हणाले की, मोहंमद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३१ जुलै १९९४ रोजी बंगल्याच्या गच्चीवर पहिली मैफल सादर केली. त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे सलग ११ वर्षे वेगवेगळ्या मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रम सादर केले. विक्रीकर विभागातील सहकारी चंद्रकांत जोशी यांच्या प्रोत्साहनामुळे २००५ मध्ये पहिल्यांदा नाट्यगृहात ‘यादगारे रफी’ मैफल आयोजित केली. रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे ‘यादगारे-रफी’ ही मैफल नाट्यगृहात सादर करीत आहे. आज मोहंमद रफी यांची पुण्यतिथी आणि सुभाष पळसकर यांचा ‘यादगारे रफी’ कार्यक्रम औरंगाबादकरांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्राधान्य स्थानावर आहे. पळसकर यांना या उपक्रमात गायिका वैशाली कुरतडीकर व मनीषा लताड यांची साथ आहे. याशिवाय रवींद्र प्रधान, जितेंद्र साळवी, संजय हिवराळे, शांताराम दरेकर, अजय तायडे आदींचा वाद्यवृंद आपापला व्यवसाय, कामे सोडून खास या ‘यादगारे रफी’ मैफलीसाठी आपला वेळ देत आहेत. रफी ‘भारतरत्न’ व्हावेत भारतीय संगीत जगाच्या सुवर्णकाळातील महान गायक मोहंमद रफी यांनी आपल्या जादुई आवाजाने अनेक पिढ्यांना आत्मानंद दिला आहे. रफींना भारतरत्न पुरस्कार मिळावा, हीच माझी अपेक्षा असल्याचे सुभाष पळसकर यांनी सांगितले.हृदयविकाराचा त्रास असतानाही मैफल गाजविली मार्च २००८ मध्ये सुभाष पळसकर यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा डॉक्टर, नातेवाईक व मित्रांनी यावर्षी मैफल करू नका, असा सल्ला दिला होता. मात्र, मोहंमद रफी यांची गाणी म्हणजे त्यांच्यासाठी नवऊर्जा देणारास्रोत होय. कोणाचेही न ऐकता त्यावर्षी त्यांनी १४ वी मैफल सादर केली. एवढेच नाही तर गाजविलीदेखील. असे धाडस अस्सल दिवानाच करू शकतो. पळसकर म्हणतात की, ‘संगीत एक थेरपी आहे. त्यामुळेच माझे आयुष्य वाढले आहे. या संगीतमय प्रवासात पत्नी स्मिता पळसकर हिची मोलाची साथ मला लाभली हे त्यांनी आवर्जून नमूद केले.
वर्षातील एक पगार मोहंमद रफींच्या आवाजासाठी
By admin | Updated: July 31, 2014 01:24 IST