सिल्लोड : तालुक्यात कोरोना रुग्णांचा आलेख चढताच आहे. शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. रविवार आणि सोमवारी दोन दिवसांत ८३ तर सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी ४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सामान्यत: लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यात दोन दिवसांत सापडलेल्या रुग्णात सिल्लोड शहरात ५४ व ग्रामीण भागात रविवारी व सोमवारी दोन दिवसात ७४ रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून ६४९ रुग्ण झाले आहेत, तर आतापर्यंत ८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षातील ६९ तर चालू वर्षात फेब्रुवारी ते मार्चपर्यंत १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत तालुक्यात सापडलेले रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत. सिल्लोड शहर ५४, उंडनगाव ०७, भवन ०७, घाटनांद्रा ०६, दिडगाव ०६, डिग्रस ०६, पिंपळदरी ०६, चिंचपूर ०६, बाळापूर ०५, भराडी ०४, शिवना ०३, पानवडोद ०३, निल्लोड ०३, डोंगरगाव ०२, कोटनांद्रा ०२, उंडनगाव ०२, आसडी, चिंचपूर, देऊळगाव बाजार, केहराळा, मोढा, खुल्लोड, जांभई या गावांमध्ये प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. शहर व ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ६४९ पैकी २७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना सुट्टी देण्यात आली. विविध रुग्णालयात ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
चिमुकल्यांनाही कोरोनाची लागण
सिल्लोड तालुक्यात कोरोनाची लागण झालेले दोन दिवसातील रुग्णांमध्ये आठ व अकरा वर्षाच्या मुलींचा व सात, बारा, चौदा वर्षाच्या बालकांचा समावेश आहे. २१ ते ३० वर्षांच्या चार युवती व २१ ते २९ वर्षांतील सहा युवकांचा समावेश आहे, अशी माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश राठोड यांनी दिली.