श्वानाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या वॉचमनच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये नुकसान भरपाई द्या
औरंगाबाद : मोकाट श्वानाच्या हल्ल्यामुळे मरण पावलेल्या शेख फिरोज शेख जाफर या मयत वॉचमनच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये नुकसान भरपाईसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गेल्या २ वर्षांपासून पाठपुरावा केला. आज पुन्हा मयत वाॅचमनची पत्नी सुलताना शेख फिरोज व सासरे शेख रज्जाक शेख आमेर यांच्यासह मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली.
१० फेब्रुवारी २०१८ रोजी रूपमहल अपार्टमेंट, हर्षनगर येथे काम करणारा वॉचमन शेख फिरोज शेख जाफर (वय ३५) मोकाट कुत्रा अपार्टमेंटमध्ये घुसल्याने त्यास हाकलण्यासाठी त्याच्यामागे गेला. मोकाट कुत्रा अपार्टमेंटच्या गच्चीवर गेला. कुत्र्यास हाकलत असताना कुत्र्याने फिरोज याच्यावर हल्ला केला. त्यामुळे फिरोज इमारतीच्या डकमधून खाली कोसळले व मृत्यू झाला. वॉचमनच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून महानगरपालिकेने त्याच्या कुटुंबास १५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली होती. त्यानंतर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर केलेला आहे. वॉचमनच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. मनपा आयुक्तांनी लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. तातडीने भरपाई देण्याचे आदेश मनपा अधिकाऱ्यांना द्यावेत तसेच यापुढे श्वानांच्या हल्ल्यात कोणीही औरंगाबादकर मृत्युमुखी पडणार नाही, यासाठीच्या प्रभावी उपाययोजना कराव्या अशीही मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर अॅड. अभय टाकसाळ, कॉ. विकास गायकवाड, कॉ. मनीषा भोळे, कॉ. अनिता हिवराळे, सुलताना शेख फिरोज, शेख रज्जाक आमेर शेख यांच्या सह्या आहेत.