औरंगाबाद : चंदनाच्या लाकडाला सोन्याचा भाव मिळत असल्यामुळे शहरातील चंदनाची झाडे चोरट्यांचे लक्ष्य ठरत आहेत. वर्षभरात १२, तर तीन वर्षांत सुमारे ४० झाडे तस्करांनी कापून नेली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान, विभागीय आयुक्तालय, सुभेदारी विश्रामगृह, जिल्हा सत्र न्यायालय आदी महत्त्वाच्या ठिकाणांवरील कडक सुरक्षाकडे भेदून तस्करानी चंदनाची झाडे तोडून नेली आहेत. शिवाय सामान्य नागरिकांनी अंगणात लावून जिवापाड जपलेली चंदनाची झाडेही चोरीला जाण्याच्या घटना चार, सहा दिवसाआड घडत आहेत. तस्करांना अटकाव करण्यास पोलीस यंत्रणा अक्षम ठरते आहे.
शहरात घरफोड्या, वाहनचोऱ्यांसोबतच चंदनाच्या झाडांची चोरी सतत होत आहे. चंदन तस्करी करणाऱ्या एका चोरट्याला जवाहरनगर पोलिसांनी महिनाभरापूर्वी रंगेहात पकडले, तर पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून दोन तस्करांना अटक केली होती. चंदन तस्करांचा म्होरक्या इलियास मात्र आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही. यामुळे चंदन तस्करी थांबायला तयार नाही. =====================
सुभेदारीतील झाडाभोवती बांधले सिमेंटचे ओटे
सुभेदारी विश्रामगृह परिसरातून चंदनाची झाडे गतवर्षी आणि दोन वर्षांपूर्वी चोरट्यांनी तोडून नेल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडाचे संपूर्ण खोड सुमारे १० फूट उंचीचे सिमेंटचे ओटे बांधून झाकले. त्यामुळे झाडाचा बुंधा चोरट्यांना कापता येत नाही. असे असतानाही गतवर्षी चोरट्यांनी ओट्यावर वाढलेले उर्वरित चंदनाचे झाड तोडून नेले होते.
=======================
चंदन तस्करांविरुद्ध दाखल खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. आ. अतुल सावे यांच्या खडकेश्वर येथील कार्यालयाच्या आवारातील चंदनाचे झाड तोडून नेणाऱ्या आरोपींना पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी अटक केली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आरोपी जामिनावर बाहेर आले आहेत. चंदन तस्करी करणाऱ्या आरोपींना शिक्षा लागल्याचे एकही ताजे उदाहरण नाही. यामुळे चंदन तस्कर अटकेला न घाबरता संघटितपणे चंदनाची झाडे शोधून तोडून नेत असल्याचे दिसून येते.