गंगापूर : औरंगाबाद जिल्ह्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवार (दि.३१) पासून दहा दिवसाचा कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होणार असून 'आमच्या रोजी रोटीचे काय' असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच लॉकडाऊन नकोरे बाबा, अशी छोट्या व्यावसायिकांची भावना आहे.
गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. ज्यांनी कर्ज काढून छोटे-मोठे उद्योग धंदे सुरू केले. त्यांना बँकांच्या रेट्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला होता. हळूहळू सर्वकाही सुरळीत होत असतांना कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. उद्योगधंदेवाले व हातावर पोट असणारे धास्तावले आहे. सर्व काळजी घेत कोरोनासोबत आम्ही जगायला तयार असून हवे तेवढे नियम कडक करा, शनिवार-रविवार लॉकडाऊन ठेवा. दैनंदिन व्यवहाराच्या वेळात बदल करा पण लॉकडाऊन करू करू नका, असे व्यावसायिकांना वाटते. दहा दिवस सर्व काही बंद राहणार असल्याने उत्पन्न ठप्प होणार आहे. यात सर्वांत जास्त हाल रोजच्या रोज कमावून खाणाऱ्यांचे होणार असल्याने लॉकडाऊन नकोच, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे.
व्यावसायिक म्हणतात..
मागील लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. त्यात आता पुन्हा लॉकडाऊन न परवडणारे आहे. त्यामुळे प्रशासनाने याचा पुनर्विचार करावा. - शैलेश कुमावत, मोबाईल व्यावसायिक.
शेती नसल्याने व्यवसायावर आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह असतो. या लॉकडाऊनमध्ये प्रचंड हाल होणार आहे. त्यामुळे कडक नियम पाळून दुकान चालू ठेवण्यास मान्यता द्यावी - किशोर घोडके, लॉड्री व्यावसायिक.
लॉकडाऊनमुळे कपड्याच्या विक्रीवर थेट परिणाम होणार असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प होणार आहे. त्यामुळे दिवसातून आठ घंटे दुकान सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. - मोबीन शेख, कापड व्यावसायिक.