पारध : पारध पोलिस ठाण्याच्या आवारातील वृक्षांची पोलिसांनी कत्तल केल्याचा प्रकार समोर आला आहे. बेसुमार वृक्षतोडीत पोलिसही मागे राहिले नाहीत. पारध पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायद्याचे रक्षक असणाऱ्या पोलिसांनीच वृक्षतोड केली. त्याद्वारे कायदा व शासनाचा आदेश धुडकावला. गेल्या १४-१५ वर्षांपूर्वी पोलिस ठाण्यात कडाक्याच्या उन्हात बसवत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी पुढाकार घेऊन पारध ठाण्यात वृक्ष लागवड केली.निसर्ग सौंदर्यात भर टाकली. मात्र हे सौंदर्य क्षणात दूर करण्यासाठी पोलिसांनी स्वयंचलित कटर मशीन आणून या झाडांची कत्तल केली. निसर्ग प्रेमींनी यावर आक्षेप घेतल्यानंतर आम्हाला कशाची परवानगी? असा उलट प्रश्न करून पोलिसांनी उर्मटपणा दाखवून दिला. ग्रामविस्तार अधिकारी डी.बी. शिंदे यांनी सांगितले, आमच्याकडे तक्रार आली तर पोलिसांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन कासार यांनी सांगितले, पोलिसांनी वन विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यांनी तर वृक्षतोड थांबविणे आवश्यक आहे. मराठवाडा व बुलडाण्यात शासनाने कुऱ्हाडबंदी आदेश जारी केला आहे. कायदेशीर कारवाईसाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असा दावा केला. (वार्ताहर)
पोलिस ठाण्यात वृक्षांची कत्तल
By admin | Updated: August 19, 2014 02:09 IST