अंबड :आगामी काळात कौशल्य विकासास अणन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या द्वारेच उद्योग क्षेत्रास कुशल मनुष्यबळ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी अंबड येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.यावेळी पालकमंत्री राजेश टोपे, बजाज अॅटो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज, प्रतापराव पवार, प्रसिद्ध सिने अभिनेता मकरंद अनासपुरे, राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचे अध्यक्ष अतुल भटनागर, निप्रो इंडियाचे अध्यक्ष मिलींद पप्पू, शिक्षक आमदार विक्रम काळे, आ. चंद्रकांत दानवे, आ. संतोष सांबरे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. एस. के. महाजन, नगराध्यक्षा मंगल कटारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जयंत पाटील म्हणाले की, सध्या जगात ज्ञानाचे भांडार उपलब्ध आहे, मात्र हे ज्ञानाचे भांडार सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून आधुनिक तंत्रज्ञानामध्ये कौशल्य विकासास अणन्य साधारण महत्व असल्याने आजच्या या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनास अणन्य साधारण महत्व आहे. मराठी माणसाची मानसिकता बदलण्याची आवश्यकता असून सुरक्षितता, घर सोडून इतरत्र राहण्याची मानसिकता त्याची घडविणे काळाची गरज आहे. तरुणांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.पालकमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास ही काळाची गरज असून उद्योग क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे एक महत्वाचा स्त्रोत आहे. उद्योगक्षेत्रास कुशल मनुष्य बळाचा पुरवठा व तरुणांना चांगली नोकरी मिळण्याच्या उद्देशाने तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून अंबड येथील कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. उद्योजकांशी चर्चा करुन कोणत्या क्षेत्रात अपुरे कुशल मनुष्यबळ आहे, याची माहिती घेऊन १५ कोटी रुपये खर्च करुन या केंद्रात सध्या २० ट्रेड सुरु करण्यात आले आहेत. लवकरच आणखी ५ ट्रेड सुरु करण्यात येणार असून त्यासाठी लागणाऱ्या ५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. सर्व ट्रेडचा अभ्यासक्रम उद्योग जगतातील जाणकारांच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. राजीव बजाज यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ कौशल्य संपादन करणेच आवश्यक नाही. तर संपादन केलेले कौशल्यात नेहमी प्रगती करणे, आवश्यक असल्याचे सांगितले. प्रतापराव पवार यांनी कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन सोहळयास शुभेच्छा देताना जास्तीस जास्त तरुणांनी आधुनिक तंत्रशिक्षणाकडे वळण्याचे आवाहन केले.सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांनी आपल्या खुमासदार शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तरुणांनी स्वावलंबनाकडे वळावे, स्वतंत्र उद्योग स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. आयुष्याला योग्य दिशा लावण्यासाठी योग्य आदर्श शोधावे व त्यांनी दाखविलेल्या मार्गाने आयुष्यास दिशा देण्याचा प्रयत्न करावा. आपले आदर्श ठरविण्यात आपण चुकत असल्याने सर्वत्र गोंधळ उडाला आहे. प्रत्येकांमध्ये एक कौशल्य असते, या कौशल्यास ओळखून त्यास विकसित करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे अनासपुरे यांनी सांगितले. (वार्ताहर)ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्र सर्वच बाबतीत देशात क्रमांक एकचे राज्य आहे. मात्र आम्ही जाहीरातीत कमी पडतो. नरेंद्र मोदी सत्तेवर येण्याआधी मोठया जोषात बोलायचे. मात्र पंतप्रधानपदी बसताच मोदी यांची बोलती बंद झाली आहे.
कौशल्य विकासाद्वारेच मिळणार कुशल मनुष्यबळ- जयंत पाटील
By admin | Updated: August 20, 2014 01:49 IST