जालना : जिल्ह्यात दुधाचे प्रति दिन संकलन दहा हजार लिटर आहे. मात्र यात दूध भेसळीचे प्रमाण प्रचंड असले तरी तपासणी किरकोळ आहे. अन्न व औषधी प्रशासनाचे वर्षभरात सहा नमुने अप्रमाणित आले असून, चौघांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वर्षभरात फक्त ३८ भेसळीचे नुमने घेण्यात आले. राज्यात जवळपास ७० टक्के दूध भेसळयुक्त असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली होती. त्या अनुषंगाने ज्ल्ह्यिातील दूध भेसळीचा आढावा घेतला असता, परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात शासकीय तसेच खाजगी असे दुधाचे संकलन होते. हे संकलन कमी असले तरी यात भेसळीचे प्रमाण जास्त असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात कारवाईचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे दुधाची भेसळ दुग्धजन्य पदार्थांमध्ये येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व औषधी प्रशासनाकडून फॅटच्या प्रमाणानुसार तपासणी करण्यात येते. म्हशीच्या दुधात सहा टक्के फॅटचे प्रमाण असावे तर गायीच्या दुधात साडेतीन टक्के फॅट असण्याची गरज आहे. प्रत्यक्षात वर्षभरात ३८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ६ नमुने अप्रमाणित करण्यात आले आहेत. सात नुमन्याचा अहवाल प्रलंबित आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या नियमानुसार आर्थिक स्वरूपाच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. एका नमुन्याला दहा ते बारा हजारांचा दंड आकारून यापुढे असे काही होणार हे लिहून घेण्यात येते. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्याचाही निकाल लवकरच लागेल, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वर्षभरात दुधाचे सहा नमुने आढळले अप्रमाणित
By admin | Updated: January 3, 2017 23:31 IST