जालना : ग्रामीण भागातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता ज्या गावांमध्ये जुन्या पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती आवश्यक आहे, अशा २०० गावांमध्ये दुरूस्तीसाठी सहा कोटींचा निधी जिल्हा परिषदेने मंजूर केला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत ज्या गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना नाही, तेथे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा प्रकारची योजना केली जाते. मात्र ज्या गावांमध्ये जुन्या योजना आहेत, परंतु त्या दुरूस्तीअभावी बंद आहेत. किंवा तेथे गळती सुरू आहे, अशा २०० गावांची निवड करून तेथे तातडीने दुरूस्तीची कामे करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. त्यानुसार या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कामे एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी
By admin | Updated: April 20, 2015 00:30 IST