बीड : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली़ परळीत सुमारे दोन लाख भाविकांनी दाटीवाटीत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले़ ‘ओम नम: शिवाय़़़ हरहर महादेव’ या जयघोषांनी परिसर भक्तीमय झाला होता़ श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला़ बीडमधील कंकालेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिरांमध्ये भाविकांची पहाटेपासूनच गर्दी होती़ धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगड, गोरक्षनाथ टेकडी तसेच कपिलधार येथेही भाविकांची तोबा गर्दी दिसून आली़ दुग्धाभिषेक , महापूजा, कीर्तन, भजन आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले़ महादेवाच्या पिंडीला बिल्वपत्र, फुल, तांदूळाची शिवमूठ अपर्ण करुन भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला़ भाविकांच्या सुविधेसाठी बॅरिकेटस् लावण्यात आले होते़यावेळी मोठा बंदोबस्त तैनात होता़चिंतेश्वर मंदिरात गर्दीगेवराई शहरातील चिंतेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली़ मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता़ यावेळी महिला, लहान मुलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ सकाळी आरती, महापूजा आदी कार्यकम पार पडले़ याशिवाय भाटेपुरी, महादेव मळी येथील मंदिरांमध्येही भाविकांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली़ तपेश्वर मंदिरातही मांदियाळीसिरसाळ्याजवळील तपोवन येथे तपेश्वर मंदिरातही हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला़ यावेळी खामगाव, औरंगपूर, वांगी, वाका, जयगाव, रेवली, सिरसाळा व परिसरातील विविध गावच्या भाविकांनी हजेरी लावली़चाकरवाडी दुमदुमलीहर हर महादेव या जयघोषात श्री क्षेत्र चाकरवाडी येथे सोमवारी हजारो भाविकांनी दर्शन घेतले़ पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या़ भाविकांसाठी येथे फराळाचीही व्यवस्था केली होती़ दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती़ घाटनांदूरमध्ये मंदिरे गजबजलीअंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरे आहेत़ श्री सोमेश्वर मंदिर, श्री जांभळेश्वर मंदिर, श्री बागेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, महादेव मंदिर, नागेश्वर मंदिर, लक्ष्मेश्वर मंदिर, बारकेश्वर तपेश्वर, बारकेश्वर मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या़ सिद्धेश्वर संस्थान भक्तिमयशिरुर तालुक्यातील सिद्धेश्वर संस्थानवर भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली़ यावेळी भजन, कीर्तन, काकडा, अभिषेक, मूर्तीपूजन आदी कार्यक्रम हर्षोल्हासात पार पडले़ जयघोषाने परिसर दुमदुमला़ (प्रतिनिधींकडून)राज्याबाहेरील भाविकांनीही लावली हजेरी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली़ बिल्वपत्र, रुटीची पाने, फुले अर्पण करुन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली़ यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले़ महिला, पुरुष व पासधारकांसाठी स्वतंत्र रांगा केल्या होत्या़ दोन लाख भाविकांनी शांततेत दर्शन घेतले, अशी माहिती वैद्यनाथ ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली़ धर्मदर्शन रांगेतील भाविक एका तासात दर्शन घेऊन बाहेर पडत होते़ राज्याच्या कानाकोपऱ्यासह दिल्ली, गजुरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी ठिकाणांहून भाविकांनी उपस्थिती लावली़ मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते़
जिल्ह्यातील शिवालये गजबजली
By admin | Updated: July 29, 2014 01:08 IST