औरंगाबाद : साहेब ड्युटीवरून आलो....दुकानावरून घरी जातोय....हॉस्पिटलमधून आलोय...दवाखान्यात जातोय...डबा घ्यायला चाललो ही आणि अशी असंख्य कारणे सांगून औरंगाबादपुरा, पैठणगेट, सिटी चौक, बेगमपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी अडवलेल्यावर कारणे सांगून वाहनचालक मार्गस्थ होत होते. सोमवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजेदरम्यानचे हे चित्र होते. पोलीसही नागरिकांची अशी कारणे ऐकूण डोक्याला हात लावत होते. तर त्यातून रिकामेे फिरणाऱ्यांना पकडून कुणाला नोटीस, कुणाला दंड करत होते.
रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत रात्रीची संचारबंदी असताना आठनंतरही साडेआठपर्यंत मुख्य बाजारपेठेतील वर्दळ सुरूच होती. पोलीस साडेसातपासून दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. तरी दुकानातील दिवे बंद करून आठपर्यंत ग्राहकांची खरेदी सुरूच होती. साडेआठनंतर रस्ते निर्मनुष्य व्हायला लागली. रुग्णालयांतून परतणारे डॉक्टर, परिचारिका कर्मचारी ये-जा करत होते. मात्र, पोलिसांकडून त्यांना ओळखपत्राशिवाय फार विचारपूस केली जात नव्हती. तर वाहनधारकांची वर्दळ सुरूच होती. शहागंज, मिलकॉर्नर, बुढी लेन, समर्थनगर, क्रांतिचौक परिसरात पोलीस प्रत्येक वाहनाला बाहेर का पडले, आठनंतर बाहेर फिरू नका, मास्क लावा, पुन्हा रात्री रस्त्यावर दिसू नका सांगत होते. मुख्य रस्ते वगळता वसाहतीचे आतील रस्ते, लहान गल्ल्यांत मुले क्रिकेट, बॅडमिंटन खेळत होते तर अनेक ओट्यांवर मुले मोबाइलवर खेळत बसलेले होते. शिवाय मित्र मेळ्यातील गप्पाही रंगल्याचे दिसून आले.