उस्मानाबाद : तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यास दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने एकास सहा महिने साधा कारावास व नुकसान भरपाई देण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. याबाबत अॅड. प्रमोद भुसारे यांनी सांगितले की, गुरूनाथ बब्रुवान पाडूळकर (रा. लासोना, ता. उस्मानाबाद) याने डॉ. आंबेडकर कारखान्यासोबत २००५-०६ मध्ये स्वत:च्या मालकीच्या ट्रॅक्टरने ऊस तोडणी व वाहतुकीचा करार केला होता. तसेच यापोटी उचल म्हणून १ लाख २५ हजार रूपये घेतले. परंतु, त्यांंनी कराराप्रमाणे काम केले नाही. त्यामुळे कारखान्याने त्याच्याकडे उचल घेतलेल्या रकमेची मागणी केली. यावर पाडूळकर याने स्वत:च्या खात्यावरील १ लाख २२ हजार २५८ रूपयांचा चेक कारखान्यास दिला होता. कारखान्याने हा चेक त्यांच्या खात्यात वटविण्यासाठी जमा केला असता खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे तो न वटता परत आला. यानंतर कारखान्याने पाडूळकर यास नोटीस पाठवून सदर रकमेची मागणी केली. परंतु, नोटीस मिळूनही त्याने रक्कम दिली नसल्याने कारखान्याने पाडूळकर याच्याविरूध्द कलम १३८ नि. ई. अॅक्ट प्रमाणे न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. हे प्रकरण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी क्र. ५ यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले. यात न्या. टी. एम. निराळे यांनी फिर्यादीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून गुरूनाथ पाडूळकर यास ६ महिने साधा कारावास व १ लाख २२ हजार २५८ रूपये एक महिन्याच्या आत फिर्यादीस देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात कारखान्याच्या वतीने अॅड. प्रमोद भुसारे यांनी फिर्याद दाखल केली होती. तर त्यांच्या वतीने अॅड. एन. डी. पाटील यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
धनादेश न वटल्याने साधी कैद
By admin | Updated: May 16, 2014 00:15 IST