जालना : श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र घनसावंगी येथील नृसिंह मंदिरात मंगळवारी हजारो भाविकांनी दर्शनाकरिता मोठी गर्दी केली. घनसावंगी पंचक्रोशीतील प्रसिद्ध श्री नृसिंह देवतेचा जन्मोत्सव सोहळा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सकाळपासूनच या ठिकाणी घनसावंगी, अंबड व परतूर या तीन तालुक्यासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने दाखल झालेल्या भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी नामघोषणाने संपूर्ण परिसर गजबजूा गेला. सहा ते आठ हजार भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर प.पू. नंदकिशोर महाराज यांचे श्री जन्माचे कीर्तन झाले. यावेळी महाआरतीनंतर भक्तांना नारळ आणि गुळाचा प्रसाद देण्यात आला. बुधवारी श्रींचा अभिषेक सोहळा होणार असून, त्यानंतर भाविक उपवास सोडणार आहेत. १७ मे रोजी लळीत होणार असून, त्याव्दारे यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. पुजारी वैभव जोशी, डॉ. प्रकाश जोशी, अशोक जोशी, रामकृष्ण धर्माधिकारी, विलास जोशी, लक्ष्मीकांत वैद्य, कृष्णा जोशी यांच्यासह भाविकांनी या उत्सवासाठी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
हजारोंच्या उपस्थितीत श्री नृसिंह जन्मोत्सव
By admin | Updated: May 14, 2014 00:40 IST