उस्मानाबाद : श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीने क्रीडा संकुलाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी स्वउत्पन्न वाढविण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे़ समितीच्या नाव नोंदणी प्रक्रियेस खेळाडुंकडून अल्प प्रतिसाद मिळाला असून, आजवर केवळ ७७ जणांनी नोंदणी केली आहे़ यात ज्येष्ठांनी आघाडी घेतली आहे़ तर विविध संघटनांचे पदाधिकारी शुल्काबाबत द्विधावस्थेत असून, झालेल्या बैठकीत विविध मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या आहेत़बदलते राहणीमान आणि हवामान यामुळे युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच व्यायम करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देवू लागले आहेत़ मात्र, उस्मानाबाद शहरात एकमेव असलेल्या श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर पाऊल ठेवण्यासाठीही नोंदणी करण्याची सक्ती समितीच्या वतीने करण्यात आली आहे़ शासनाकडून दुरूस्तीसाठी छदामही मिळणार नसल्याने स्वउत्पन्न वाढवून देखभाल दुरूस्तीसाठी हा निर्णय घेतल्याचे समितीकडून सांगण्यात येत आहे़ यात क्रिकेट स्पीचसाठी १२ हजार रूपये, पोलिस भरतीचा व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या युवकांना ५०० रूपये, स्केटींग, बास्केटबॉलसह इतर खेळ खेळण्यासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना १०० रूपये, ज्येष्ठ नागरिकांना ५० रूपये असे विविध दर आकारण्यात आले आहेत़ पहाटे ५़३० वाजता मैदान खुले करण्यात येणार आहे़ तर ज्येष्ठांसाठी सकाळी १०़३० ते ३़३० या वेळेत हा प्रवेश बंद राहणार आहे़ सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे़ प्रारंभी समितीच्या या निर्णयाबाबत अनेकांची मतमतांतरे दिसून आली़ क्रीडा समितीच्या या निर्णयाचे स्वागत करीत ज्येष्ठांनी आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची मागणी केली होती़ केवळ मागणी करून न थांबता नाव नोंदणीतही ज्येष्ठांनी आघाडी घेतली आहे़ आजवर ४० सदस्यांनी क्रीडा समितीकडे नियमानुसार शुल्क जमा केले आहे़ तर २४ शालेय खेळाडूंनी व इतर १३ अशा एकूण ७७ जणांनी समितीकडे शुल्क भरले आहे़ जिल्हा संकुलावर दररोज येणारे खेळाडू-नागरिक पाहता समितीच्या निर्णयाला १२ जून पर्यंतही अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे़ (प्रतिनिधी)सात लाख वर्ग, तरीही काम रखडले...क्रीडा संकुलावर स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी बांधकाम विभागाकडे जवळपास साडेसात लाख रूपये वर्ग करण्यात आल्याचे क्रीडा कार्यालयाकडून सांगण्यात आले़ पिण्याचे पाणी व शौचालयाची व्यवस्था नसल्याने येथे येणाऱ्या खेळाडूंसह ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत़ मात्र, पैसे वर्ग झालेले असतानाही बांधकाम विभागाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरू असून, हे काम कधी होणार ? याचे उत्तर अधिकाऱ्यांकडेही नाही़स्विमिंग पूल दुरूस्ती धुसरकोट्यवधी रूपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंगपूल क्रीडा संकुलात उभारण्यात आला आहे़ जिल्ह्यातील जलतरण पटुंसाठी ही महत्त्वाची बाब होती़ मात्र, अनेक वर्षापासून बंद असलेला हा स्विमिंग पूल दुरूस्त करण्यासाठी ६० ते ७० लाख रूपयांची आवश्यकता असल्याचे समजते़ त्यामुळे इतका निधी उभारणार कुठून ? दुरूस्तीचा आराखडा तयार करणारा आर्किटेक नियुक्त होणार कधी आणि याचे दुरूस्तीचे काम पूर्ण होणार कधी ? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत़फक्त वेळेतच पाऊल ठेवाक्रीडा संकुलावर प्रवेशासाठी वार्षिक ५० रूपये व इतर विविध खेळांसाठी ठरवून दिलेले मासिक शुल्क प्रत्येकाला भरावे लागणार आहे़ ते शुल्क भरल्यानंतर समितीकडून संबंधितांना जवळपास एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे़ त्या वेळेतच त्यांना प्रवेश देण्याचे अधिकाऱ्यांचे नियोजन असून, त्याच वेळेत संबंधितांना क्रीडा संकुलात पाऊल ठेवता येणार आहे़ अधिकाऱ्यांच्या या निर्णयावरून ‘महाभारत’ होणार की खेळाडू-ज्येष्ठ मंडळी या वेळेच्या सक्तीला स्विकारणार हे आगामी काळात समोर येईल़आर्किटेक मिळणार कधी ?क्रीडा संकुलात रखडलेली विविध कामे, दुरूस्तीची कामे करण्यासाठी आर्किटेकची गरज आहे़ आर्किटेक नियुक्तीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून दोन वेळेस नियुक्तीसाठी प्रक्रिया घेण्यात आली़ पहिल्यावेळी एकही आर्किटेक क्रीडा कार्यालयाकडे फिरकला नाही़ दुसऱ्या वेळेस आलेले दोन आर्किटेक नियमाच्या चौकटीत न बसल्याने त्यांचीही नियुक्ती करण्यात आली नाही़ आता तिसऱ्या वेळेस नियुक्तीची प्रक्रिया होणार असून, आता तरी आर्किटेक मिळणार का ? हा प्रश्न अधिकाऱ्यांनाच सतावत आहे़
क्रीडा संकुलातील नाव नोंदणीस अल्प प्रतिसाद
By admin | Updated: June 15, 2014 00:57 IST