येरमाळा : रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरु ठेवल्याबाबत जाब विचाणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.जी. चिखलीकर यांच्याशी धक्काबुक्की करणाऱ्या हॉटेल मालकासह कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी पहाटे येरमाळा येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चिखलीकर हे दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह रात्री दीडच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळी येरमाळा चौकातील हॉटेल दत्त दिगंबर सुरु असल्याचे निदर्शनास आले. चिखलीकर यांनी हॉटेल मालकास ते बंद करण्यास सांगितले असता, सदर हॉटेलमधील मालकासह इतर कर्मचाऱ्यांनी बाचाबाची तसेच धक्काबुक्की केली. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल अशोक शेंडगे यांच्या फिर्यादीवरुन हॉटेल मालक दत्तात्रय वीरभद्र तोडकरी, ज्ञानदेश्वर महारुद्र तोडकरी व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा तसेच वेळेचे बंधन न पाळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने हॉटेल व्यावसायीकाविरुद्ध मोहीम उघडली असून, रितसर हॉटेल परवाना दाखवा व त्यानंतरच हॉटेल चालू करा, असा कडक पवित्रा घेतला आहे. (वार्ताहर)
फौजदारास धक्काबुक्की
By admin | Updated: November 20, 2014 00:47 IST